Israel-Gaza war nears genocide as 25 lives lost in school attack 70% of Gaza lies in ruins
Israel bombs on Gaza school : 7 ऑक्टोबर 2023 रोजी सुरू झालेल्या इस्रायल-हमास युद्धाने आता पूर्णपणे नरसंहाराचे स्वरूप घेतले आहे. युद्धाच्या अठ्ठावीसव्या आठवड्यात इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या भीषण हवाई हल्ल्यात एका बालवाडी शाळेवर टाकलेल्या बॉम्बमुळे २५ लोक जिवंत जळून मृत्युमुखी पडले. ही शाळा निर्वासित छावणी म्हणून वापरली जात होती. मृतांमध्ये रेड क्रॉसचे कर्मचारी, पत्रकार, लहान मुले आणि गाझातील सर्वात तरुण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर याकिन हम्मद (वय ११) यांचा समावेश आहे.
अल जझीराच्या वृत्तानुसार, शाळेला लागलेल्या आगीत संपूर्ण इमारत भस्मसात झाली, आणि अनेक लोक अडकून पडल्यामुळे त्यांचा आगीत होरपळून अंत झाला. या भीषण घटनेमुळे इस्रायलवर आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेधाचा पाऊस सुरू झाला आहे. स्पेनने इस्रायलवर निर्बंध लावण्याची मागणी जगभरातील देशांकडे केली आहे. युद्धात आतापर्यंत ५५,००० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले आहेत, ज्यात हजारो लहान मुले, महिला आणि वृद्धांचा समावेश आहे. गाझामध्ये १९ लाख लोक विस्थापित झाले असून, त्यातील बहुतांश लोक रस्त्यावर राहत आहेत.
गाझा मीडिया कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, गाझाच्या ७० टक्क्यांहून अधिक नागरी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. गाझा पट्टीच्या ७७% भागावर इस्रायलने ताबा मिळवला आहे, आणि लाखो नागरिकांना जबरदस्तीने बेदखल करण्यात आले आहे. इस्रायली सैन्याने ‘नेत्झरिम कॉरिडॉर’च्या माध्यमातून गाझा दोन भागात विभागले असून, नागरिकांची मुक्त हालचाल जवळपास अशक्य झाली आहे. अनेक घनवस्तीत ‘नो-गो झोन’ घोषित करण्यात आले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘लोकांना मारण्यासाठी धर्माचा वापर केला…’ बहरैनमध्ये असदुद्दीन ओवैसी पाकिस्तानवर पुन्हा कडाडले
२३ मे रोजी इस्रायलच्या हल्ल्यात खान युनिसमधील महिला डॉक्टर डॉ. अल-नज्जर यांच्या ९ मुलांचा मृत्यू झाला, आणि त्यांचा एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. मृत मुलांचे वय फक्त ७ महिने ते १२ वर्षे इतके होते. डॉक्टरच्या पतीलाही गंभीर इजा झाली आहे. गेल्या एक आठवड्यात ५०० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेले, तर शनिवार-रविवारी झालेल्या हल्ल्यांत १८२ जणांचा मृत्यू झाला, यामध्येही लहान मुले आणि महिलांचा मोठा समावेश आहे.
इस्रायलच्या पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी जाहीरपणे म्हटले आहे की, “हमासचा पूर्ण नाश होईपर्यंत गाझावरचे लष्करी कारवाई थांबवली जाणार नाही.” तसेच युद्ध संपल्यानंतर गाझा क्षेत्र इस्रायली सैन्याच्या नियंत्रणाखालीच राहील, आणि मदत वाटपही त्यांच्या देखरेखीखाली होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. इस्रायलचे म्हणणे आहे की हमास लष्करी पायाभूत सुविधा नागरिक भागातच उभारतो, त्यामुळे ‘लक्ष्यित कारवाया’ करताना सामान्य नागरिकही मरण पावतात. मात्र, संयुक्त राष्ट्र, युनिसेफ आणि जागतिक अन्न कार्यक्रमाने गाझामधील मानवतावादी संकटाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. युनिसेफच्या अहवालानुसार, गाझामधील ९६ टक्के मुले कुपोषित आहेत, आणि दुष्काळाची तीव्र शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘रशियाने ओबामा प्रशासनाच्या काळात तंत्रज्ञान चोरले…’ डोनाल्ड ट्रम्पची पुन्हा बोलबच्चनगिरी, काय सत्य?
गाझा मीडिया कार्यालयाने इस्रायलवर “वांशिक शुद्धीकरणाचा कट” रचल्याचा आरोप करत, संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडे त्वरित हस्तक्षेपाची मागणी केली आहे. आज गाझामध्ये ढिगाऱ्याखाली हजारो मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत, आणि मानवतेला कलंकित करणाऱ्या या युद्धाची परिणती अजूनही अस्पष्ट आहे. गाझा अजूनही होरपळतो आहे. आणि जग फक्त बघत आहे.