'लोकांना मारण्यासाठी धर्माचा वापर केला…' बहरैनमध्ये असदुद्दीन ओवैसी पाकिस्तानवर पुन्हा कडाडले ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Asaduddin Owaisi On Pakistan : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाच्या विरोधात भारताने जागतिक स्तरावर मोठी मोहीम सुरू केली असून, बहरैनमध्ये भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाने पाकिस्तानचा कठोर शब्दांत निषेध केला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर, भारताने ३३ देशांमध्ये शिष्टमंडळे पाठवून पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा पर्दाफाश करण्याचे धोरण आखले आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून AIMIM चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी बहरैनमध्ये इस्लामचे स्पष्टीकरण देत पाकिस्तानवर जोरदार टीका केली.
असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या भाषणात ठामपणे सांगितले की, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना भारतात निष्पाप लोकांच्या हत्या करत आहेत आणि या हिंसाचारासाठी कुराणातील आयतींचा गैरवापर करत आहेत. इस्लामचा खरा संदेश शांतता आणि मानवतेचा आहे. त्यांनी स्पष्ट केले की, “एक निष्पाप व्यक्तीची हत्या ही संपूर्ण मानवजातीच्या हत्येसारखी आहे” हे कुराण सांगते.
“या दहशतवादी गटांनी धर्माचा बडगा उगारला आहे. त्यांनी लोकांना मारण्यासाठी धर्माचा वापर केला आहे. इस्लाम या प्रकाराच्या सर्व हिंसाचाराचा निषेध करतो,” असे ओवैसी ठामपणे म्हणाले. त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादाला धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या भयानक हिंसेचे स्वरूप दिले आणि इस्लामचा चुकीचा अर्थ लावून जगभरात मुस्लिम समाजाची बदनामी केली जात आहे, असे नमूद केले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘रशियाने ओबामा प्रशासनाच्या काळात तंत्रज्ञान चोरले…’ डोनाल्ड ट्रम्पची पुन्हा बोलबच्चनगिरी, काय सत्य?
ओवैसी यांनी हेही नमूद केले की, भारतात राजकीय मतभेद असले तरी देशाच्या अखंडतेच्या बाबतीत सर्व पक्ष एकत्र आहेत. “जेव्हा देशाच्या सीमांची आणि नागरिकांच्या सुरक्षेची गोष्ट येते, तेव्हा संपूर्ण भारत एकत्र उभा राहतो,” असे ते म्हणाले. त्यांनी बहरैन सरकारला विनंती केली की, FATF (Financial Action Task Force) या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून पाकिस्तानला पुन्हा ग्रे लिस्टमध्ये टाकण्यास मदत करावी, कारण पाकिस्तानमधून मिळणाऱ्या निधीचा वापर दहशतवादासाठी होतो आहे. “बहरैनचा पैसा पाकिस्तानच्या दहशतवादी गटांकडे जातो आहे. हे थांबले पाहिजे,” अशी ओवेसींची ठाम भूमिका होती.
#WATCH | Manama, Bahrain: During an interaction with the prominent personalities, AIMIM MP Asaduddin Owaisi says, ” …Our govt has taken all the steps to protect the lives of every Indian. This govt has made very clear next time you (Pakistan) take up this misadventure, it will… pic.twitter.com/pIV0B04e9h
— ANI (@ANI) May 24, 2025
credit : social media
ओवैसी यांनी सांगितले की, भारत सरकारने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत. त्यांनी चेतावणी दिली की, पुढच्या वेळेस पाकिस्तानने दहशतवादी कृत्य करण्याचा प्रयत्न केल्यास, भारताचे उत्तर त्यांच्या अपेक्षेपेक्षा अधिक कडक असेल. “दुर्दैवाने, अनेक वर्षांपासून आम्ही अनेक निष्पाप लोकांचे प्राण गमावले आहेत. यामागील एकमेव जबाबदार पाकिस्तान आहे, जो दहशतवादी संघटनांना आश्रय, मदत आणि आर्थिक पाठबळ देतो,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : तिसऱ्या विश्वमहायुद्धामागील खरा मास्टरमाइंड आहे ‘हा’ देश! पाकिस्तानचे मंत्री ख्वाजा आसिफने अखेर तोंड उघडले
बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात विविध पक्षांचे खासदार सहभागी झाले आहेत. निशिकांत दुबे, फांगनॉन कोन्याक, रेखा शर्मा, सतनाम सिंह संधू, गुलाम नबी आझाद आणि राजदूत हर्ष श्रृंगला. हे शिष्टमंडळ जगभरातील ३३ देशांना भेट देत असून, पाकिस्तानचा खरा चेहरा आंतरराष्ट्रीय पातळीवर उघड करण्यासाठी सक्रिय आहे. बहरैनमध्ये या शिष्टमंडळाने पाकिस्तानविरोधात आवाज उठवत जगाला भारतावर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचे स्वरूप आणि त्यामागील पाकिस्तानची भूमिका दाखवून दिली आहे.
भारताने दहशतवादाच्या विरोधात सुरू केलेली ही जागतिक मोहीम, विशेषतः धार्मिक संदर्भांतील अचूक स्पष्टीकरण देत, पाकिस्तानच्या ढोंगी धोरणांचा मुखवटा फाडणारी ठरत आहे. असदुद्दीन ओवैसींसारख्या मुस्लिम नेत्यांनी इस्लामचा शांततावादी संदेश मांडत पाकिस्तानच्या दहशतवादाचे खंडन केल्याने जगापुढे भारताचा प्रगल्भ आणि समजूतदार दृष्टिकोन स्पष्ट झाला आहे.