रशियाने अमेरिकन हायपरसोनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान चोरले... डोनाल्ड ट्रम्प यांनी केला मोठा दावा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Russia stole US hypersonic technology : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा खळबळजनक वक्तव्य करून आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. ट्रम्प यांनी आरोप केला आहे की, रशियाने अमेरिकेचे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान ओबामा प्रशासनाच्या काळात चोरले होते. या वक्तव्यामुळे अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात तर वादंग निर्माण झाला आहेच, पण जागतिक स्तरावरही चर्चेला नवे खाद्य मिळाले आहे.
ट्रम्प वेस्ट पॉइंट मिलिटरी अकॅडमीच्या पदवीप्रदान समारंभात बोलत होते. यावेळी त्यांनी सैन्याच्या भविष्याबाबत आणि राष्ट्रीय संरक्षणाविषयी भूमिका मांडताना हे वादग्रस्त विधान केले. त्यांनी सांगितले की, “आज येथे आठ कॅडेट्सनी स्वतःचे हायपरसॉनिक रॉकेट डिझाइन करण्याचे आव्हान स्वीकारले आहे. आम्ही ते सध्या तयार करत आहोत. पण आमचे मूळ तंत्रज्ञान चोरीला गेले आहे. ते ओबामा प्रशासनाच्या काळात रशियाने चोरले.”
हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे ही आजच्या काळातील सर्वाधिक प्रगत आणि घातक शस्त्रे मानली जातात. ती ध्वनीच्या वेगापेक्षा पाच पट अधिक गतीने (Mach 5 पेक्षा जास्त) लक्ष्यावर झेपावतात, त्यामुळे त्यांचा पल्ला मोठा आणि अचूकताही अधिक असते. ही तंत्रज्ञान चोरी गेल्याचा दावा केल्याने, अमेरिकेच्या संरक्षण क्षेत्रात गहजब माजला आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, “रशियन लोकांनी ते चोरले, काहीतरी वाईट घडले, आणि आता आम्ही पुन्हा नव्याने ते तंत्रज्ञान विकसित करत आहोत. आम्ही त्याचे मूळ डिझायनर आहोत.” या वक्तव्याने अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : तिसऱ्या विश्वमहायुद्धामागील खरा मास्टरमाइंड आहे ‘हा’ देश! पाकिस्तानचे मंत्री ख्वाजा आसिफने अखेर तोंड उघडले
ट्रम्प यांनी या भाषणात सध्याच्या बायडेन प्रशासनाच्या लष्करी धोरणांवरही घणाघाती टीका केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, अमेरिकन सैन्याचे काम हे शत्रूंना पराभूत करणे आणि देशाच्या मूल्यांचे रक्षण करणे हेच असले पाहिजे. “आम्ही आता लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून बाजूला हटत आहोत. आमच्या सैन्याचे मुख्य ध्येय म्हणजे अमेरिकेच्या शत्रूंना चिरडणे, त्यांचा नाश करणे आणि आमचा महान अमेरिकन ध्वज अभूतपूर्व पद्धतीने उंचावणे हे आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी लष्करी तळांवरील “ड्रॅग शो” किंवा परदेशी संस्कृतींच्या संवर्धनावरही टीका केली. “हे लष्कराचे काम नाही. सैन्याने त्याच्या मूळ उद्दिष्टांकडे परत जावे,” असे ट्रम्प यांनी ठामपणे सांगितले.
ट्रम्प यांच्या या भाषणाने पुन्हा एकदा त्यांचे राष्ट्रवादी आणि कठोर लष्करी धोरण पुढे आले आहे. 2024 च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे हे वक्तव्य राजकीय डावपेचाचा भाग असल्याचे विश्लेषक मानतात. ओबामा आणि बायडेन प्रशासनांवर सातत्याने टीका करत त्यांनी रिपब्लिकन मतदारांना पुन्हा संघटित करण्याचा प्रयत्न केला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : All Party Delegation: ‘जवाहरलाल नेहरूंपासून PM मोदींपर्यंत…’ कनिमोळींच्या शिष्टमंडळाने रशियामध्ये पाकिस्तानचा पाडला फडशाच
या विधानामुळे अमेरिका-रशिया संबंधांमध्ये आणखी तणाव वाढण्याची शक्यता आहे. रशियाने या आरोपांवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र अमेरिकेतील विरोधकांनी ट्रम्प यांचे वक्तव्य “बोलबच्चनगिरी” म्हणून टीकेचा धनी बनवले आहे. तथापि, या वक्तव्यातून ट्रम्प यांनी पुन्हा आपली “मजबूत अमेरिका” ही प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्टपणे दिसते. त्यांच्या या विधानाचे पुढील राजकीय व सामरिक पडसाद पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.