Israeli army raids West Bank Palestinians seize Rs 4 crore
Israeli army raid West Bank : मध्यपूर्वेतील संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धासोबतच आता इस्रायली सैन्याने वेस्ट बँकवर आपले डाव अधिक तीव्र केले आहेत. नुकत्याच झालेल्या एका कारवाईत इस्रायली सैन्याने वेस्ट बँकातील रामल्लाह शहरात मोठा छापा टाकला आणि तब्बल १.५ दशलक्ष शेकेल म्हणजेच अंदाजे ४ कोटी रुपयांची रोकड जप्त केली. इस्रायलने ही रक्कम ‘दहशतवादी निधी’ असल्याचा दावा केला आहे.
इस्रायली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा छापा रामल्लाहच्या मध्यवर्ती भागातील एका चलन विनिमय केंद्रावर टाकण्यात आला. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोकड साठवली गेली होती. इस्रायलच्या मते, या पैशांचा उपयोग हमास या संघटनेपर्यंत निधी पोहोचवण्यासाठी होत होता. त्यामुळे ही कारवाई आवश्यक असल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. या छाप्यामध्ये स्थानिक पॅलेस्टिनी नागरिकांनी विरोध केला आणि त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. रेड क्रेसेंटच्या अहवालानुसार डझनभर पॅलेस्टिनी जखमी झाले आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Trump Tariff : भारत अमेरिका व्यापारयुद्धावर संपूर्ण जगाची नजर; जाणून घ्या जागतिक माध्यमांनी काय लिहिले?
गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आधीच परिस्थिती गंभीर असताना, आता वेस्ट बँकवरही इस्रायली सैन्याने दडपशाही सुरू केली आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी युद्ध पेटल्यानंतर वेस्ट बँकवर हल्ले आणि छापे वाढले आहेत. यापूर्वीही इस्रायलने चलन विनिमय केंद्रांवर छापे टाकले होते. वेस्ट बँक हा भाग १९६७ पासून इस्रायलच्या ताब्यात आहे. या भागात पॅलेस्टिनी प्राधिकरणाचे मुख्यालय असले तरी, सैन्याचे नियंत्रण इस्रायलच्याकडेच आहे. त्यामुळे येथे नेहमीच अस्थिरता निर्माण होत असते.
इस्रायली पोलिस प्रवक्त्याने दिलेल्या निवेदनात सांगितले की, जप्त करण्यात आलेली रोकड हमासपर्यंत पोहोचवली जाणार होती. गाझा आणि वेस्ट बँक यांच्यातील संपर्क इस्रायलने कडक नियंत्रणाखाली ठेवला आहे. अशा परिस्थितीत इतकी मोठी रक्कम गाझामध्ये नेणे कठीण असते. तरीसुद्धा, स्थानिक मनी एक्सचेंजमार्फत हा निधी हस्तांतरित करण्याचे प्रयत्न सुरू होते, असा इस्रायलचा दावा आहे.
गाझा युद्धानंतर इस्रायल-पॅलेस्टिनी संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. एएफपीच्या आकडेवारीनुसार, युद्ध सुरू झाल्यापासून वेस्ट बँकमध्ये किमान ९७२ पॅलेस्टिनी मृत्युमुखी पडले आहेत, तर इस्रायली सैन्य आणि वसाहतवाद्यांच्या कारवायांमुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. दुसरीकडे, इस्रायली आकडेवारीनुसार या काळात वेस्ट बँक आणि इतर भागांतील हल्ल्यांमध्ये ३६ इस्रायली नागरिक आणि जवान प्राण गमावले आहेत.
या सततच्या कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता व्यक्त केली जात आहे. मध्य रामल्लाहसारख्या ठिकाणी अशा छापा कारवाया फार क्वचितच होतात. त्यामुळे आता वेस्ट बँकात परिस्थिती आणखी बिघडण्याची भीती निर्माण झाली आहे. आधीच गाझामध्ये मानवी संकट गडद होत असताना, वेस्ट बँकातील अशा छाप्यांमुळे संघर्षाचे ज्वाळा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ’30 लाख लोकांचा बळी, लाखो महिलांवर अत्याचार’ हे विसरणे अशक्य; पाकिस्तानच्या माफीनाम्याला बांगलादेशी तज्ज्ञांचे सडेतोड उत्तर
पॅलेस्टिनी जनतेचे म्हणणे आहे की, इस्रायल या कारवाया करून त्यांच्या रोजीरोटीवर गदा आणत आहे. घरांवर, व्यापारी केंद्रांवर, चलन विनिमय कार्यालयांवर होणारे छापे केवळ आर्थिक नुकसानीपुरते मर्यादित राहत नाहीत, तर स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरवतात. गाझा युद्ध सुरू झाल्यापासून इस्रायलने आपली लष्करी रणनीती वेस्ट बँकपर्यंत विस्तारली आहे. रामल्लाहमधील छापा आणि तब्बल ४ कोटी रुपयांची रोकड जप्ती ही त्याची ताजी उदाहरणे आहेत. इस्रायल याला दहशतवादविरोधी मोहिम म्हणत असला तरी, पॅलेस्टिनी नागरिकांना मात्र हा थेट छळ वाटत आहे. मध्यपूर्वेतील हा संघर्ष अद्याप शांत होण्याचे लक्षण दिसत नाही, उलट त्याचे पडसाद आणखी गंभीर होताना जाणवत आहेत.