जेरूसेलम: इस्त्रायल हिजबुल्लाह युद्ध संपण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच हिजबुल्लाहने इस्त्रायलला पेजर हल्ल्यांचे प्रत्युत्तर दिले होते. दरम्यान इस्त्रायलने आता पुन्हा एकदा लेबनॉनच्या हिजबुल्लाह-नियंत्रित प्रदेशावर सर्वात भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यात 20 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेरुसलेम येथील इस्रायली लष्कराने बेरूतच्या दक्षिणी उपनगरांवर जोरदार हवाई हल्ला केला आहे.
हिजबुल्लाहच्या शस्त्रास्त्र व क्षेपणास्त्रांच्या ठिकाणांवर लक्ष
मीडिया रिपोर्टनुसार, लेबनॉनच्या मध्यवर्ती भागात मंगळवारी सकाळी हे हल्ले सुरू करण्यात आले. या हल्ल्यामुळे बेरूतच्या आकाशात धुराचे लोट पसरले. हा हल्ला हिजबुल्लाहच्या शस्त्रास्त्र व क्षेपणास्त्रांच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करून करण्यात आला असल्याचे इस्रायली सैन्याने स्पष्ट केले आहे. इस्रायली सैन्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी नागरिकांची हानी टाळण्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. त्यांनी हिजबुल्लाहवर आरोप केला की नागरी ठिकाणांचा वापर करून ते लोकांना “मानवी ढाल” बनवित आहेत, मात्र हिजबुल्लाहने हे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे.
हिजबुल्लाहचे प्रत्युत्तर
याशिवाय हिजबुल्लाहनेही इस्रायलला प्रत्युत्तर देत ड्रोनद्वारे हल्ले केले. उत्तर इस्रायलमधील नाहारिया या शहरातील निवासी इमारतीवर हिजबुल्लाहच्या ड्रोन हल्ल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. नाहारियाच्या पूर्वेकडील लष्करी तळावर हा हल्ला झाला. उत्तरेकडील या ड्रोन हल्ल्यांमुळे इस्रायली नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा लागला.
बेरूत रहिवाशांचे दक्षिणेकडील उपनगरातून पलायन
लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, माउंट प्रांतातील बालचामे गावात आठ आणि चौफ जिल्ह्यातील जौन गावात 15 लोक ठार झाले आहेत. दक्षिणेत तेफाहता येथे पाच, नाबतीहवर दोन आणि टायर या किनारपट्टीवरील शहरात एक जण मरण पावला. हर्मेल येथे झालेल्या हल्ल्यात आणखी एकाचा मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्यापासून इस्रायलने लेबनॉनवर सातत्याने बॉम्बफेक सुरू केल्यामुळे अनेक बेरूत रहिवाशांनी दक्षिणेकडील उपनगरातून पलायन केले आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर प्रसारित फुटेजमध्ये दिसत आहे की, इस्रायली हल्ल्यात दोन क्षेपणास्त्र जवळपास 10 मजली इमारतीवर आदळल्याने ती संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली, आणि मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले. हा हल्ला लेबनॉनच्या सुरक्षेला आणि सामान्य नागरिकांच्या जीवनावर गंभीर परिणाम करणारा ठरला आहे.