Jaishankar to visit Europe amid Operation Sindoor
Jaishankar Europe visit : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे युरोपच्या सहा दिवसांच्या महत्त्वपूर्ण दौऱ्यावर रवाना होत आहेत. नेदरलँड्स, डेन्मार्क आणि जर्मनी या तीन देशांच्या नेत्यांशी ते राजनैतिक, सामरिक आणि आर्थिक सहकार्याबाबत चर्चा करणार असून, विशेषत: पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ठळकपणे मांडला जाण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी अधिकृत माहिती देताना सांगितले की, जयशंकर यांचा हा दौरा १९ ते २४ मे दरम्यान पार पडणार आहे. हे दौरे केवळ द्विपक्षीय संबंधच मजबूत करतील असे नाही, तर भारताच्या जागतिक धोरणात्मक उपस्थितीलाही नवे परिमाण देणार आहेत.
पाहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांवर प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर १० मे रोजी दोन्ही देशांनी संघर्षविराम स्वीकारला. या कारवाईमागील पार्श्वभूमी, उद्देश आणि यशस्वी अंमलबजावणीची माहिती जयशंकर हे युरोपमधील आपल्या समकक्षांना देणार आहेत. या माध्यमातून भारत जागतिक व्यासपीठावर दहशतवादविरोधी आपली भूमिका स्पष्ट आणि ठामपणे मांडण्याच्या तयारीत आहे.
जयशंकर यांचा दौरा जर्मनीच्या नव्या चांसलर फ्रेडरिक मर्झ यांच्या नियुक्तीनंतर होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रेडरिक मर्झ यांना X (माजी ट्विटर) वरून शुभेच्छा दिल्या असून, भारत-जर्मनीमधील सहकार्य अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर जयशंकर यांची ही भेट दोन्ही देशांमध्ये तंत्रज्ञान, व्यापार, नवोन्मेष, हरित ऊर्जा आणि जागतिक सुरक्षेच्या मुद्द्यांवर निर्णायक ठरणार आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तान लष्कराचे मुख्यालय भूमिगत बोगद्यात हलवले जाणार; भारताच्या कारवाईची भीती की युध्दाच्या सावटाची चाहूल?
पाहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांनी भारताविरुद्ध झालेल्या हिंसेचा तीव्र निषेध केला होता. त्यांनी दहशतवादाविरोधातील लढ्यात भारताला पूर्ण पाठिंबा दिला आहे. नेदरलँड्स, डेन्मार्क आणि जर्मनी या तिन्ही देशांनी भारतातील हिंसाचाराविषयी सहानुभूती व्यक्त केली असून, या दौऱ्याच्या माध्यमातून त्या भावनांना राजनैतिक, आर्थिक आणि सुरक्षा सहकार्याच्या स्तरावर अधिक स्पष्ट आकार दिला जाणार आहे.
या दौऱ्याच्या अनुषंगाने अनेक परराष्ट्र धोरण तज्ञांनी म्हटले आहे की, जयशंकर यांचा हा दौरा भारताच्या आंतरराष्ट्रीय उपस्थितीला बळकटी देणारा ठरेल. जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारताने दहशतवाद, उर्जा सुरक्षेला प्राधान्य, आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या माध्यमातून आपले हित जपले पाहिजे. या दौऱ्यातून युरोपमधील भारताचे विश्वासार्ह आणि सामरिक सहकारी देश म्हणून स्थान अधिक बळकट होणार आहे. तिन्ही देशांतील बैठका आणि करारांवर देश-विदेशातील धोरणकर्ते, व्यापारी आणि जनता बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIDEO VIRAL : 277 प्रवाशांसह मेक्सिकन नौदलाचे जहाज अचानक ब्रुकलिन ब्रिजवर आदळले, 19 जण जखमी, 4 गंभीर
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर जयशंकर यांचा हा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा भारताच्या दहशतवादविरोधी लढ्याला जागतिक पाठिंबा मिळवून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याशिवाय, युरोपसोबतचे धोरणात्मक संबंध, नवोन्मेष, व्यापार आणि जागतिक सुरक्षेच्या संदर्भातील चर्चांमुळे भारताच्या जागतिक स्थैर्याला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.