पाकिस्तान लष्कराचे मुख्यालय भूमिगत बोगद्यात हलवले जाणार; भारताच्या कारवाईची भीती की युध्दाच्या सावटाची चाहूल? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Pakistan Army HQ relocation : भारताच्या “ऑपरेशन सिंदूर”मुळे भयभीत झालेल्या पाकिस्तानने आपल्या लष्कराचे मुख्यालय रावळपिंडीहून इस्लामाबादजवळील मार्गल्ला टेकड्यांमध्ये हलवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हे केवळ मुख्यालयाचं स्थलांतर नसून, लष्करप्रमुखांचे नियंत्रणकक्ष, कार्यालय आणि निवासस्थानही या भूमिगत नव्या जागी नेण्यात येणार आहे.
१० मे रोजी भारतीय हवाई दलाने रावळपिंडीतील नूर खान एअरबेसवर केलेल्या अचूक आणि धडाकेबाज हल्ल्यामुळे पाक लष्कर खवळले. यानंतरच त्यांनी आपल्या संरक्षण व्यवस्था पुन्हा उभी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनी नुकतीच घोषणा केली होती की युद्धबंदी केवळ १८ मेपर्यंत आहे. म्हणजे आजच्या दिवसापर्यंत. त्यामुळे, यानंतर भारताकडून आणखी एखादी निर्णायक लष्करी कारवाई होण्याची शक्यता प्रबळ आहे.
या भीतीपोटी, पाकिस्तानने रावळपिंडीहून इस्लामाबादजवळील मार्गल्ला टेकड्यांमध्ये १० किलोमीटर लांबीच्या भव्य बोगद्यात लष्करी मुख्यालय उभारण्याचे काम वेगात सुरू केले आहे. हे काम प्रत्यक्षात २००४ मध्ये परवेझ मुशर्रफ यांच्या कार्यकाळात सुरू झाले होते. मात्र आता, भारताच्या दबावामुळे हे काम युद्धपातळीवर पूर्ण केलं जात आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIDEO VIRAL : 277 प्रवाशांसह मेक्सिकन नौदलाचे जहाज अचानक ब्रुकलिन ब्रिजवर आदळले, 19 जण जखमी, 4 गंभीर
नवीन मुख्यालयात ६ बेडरूमचे ९० बंगले, ४ बेडरूमचे ३०० घरं, १४,७५० अपार्टमेंट्स, आणि एक बहुमजली शॉपिंग कॉम्प्लेक्स देखील बांधण्यात आला आहे. येथील भूमिगत मुख्यालय टेकडीच्या पायथ्याशी असून बॉम्ब वा क्षेपणास्त्रांपासून सुरक्षित मानले जात आहे. या ठिकाणी केवळ लष्करी अधिकार्यांची वास्तव्य नव्हे तर संपूर्ण कमांड साखळीचे वास्तव्य ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, मार्गल्ला टेकड्यांपासून फक्त ३ किलोमीटरवर पाकिस्तानी हवाई दलाचा तळ आहे आणि ६ किलोमीटर अंतरावर नौदलाचे मुख्यालय आहे. त्यामुळे, सर्व लष्करी संस्थांचे समन्वयित नियंत्रण एका सुरक्षित झोनमध्ये एकवटले जाईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘भारताचे आता जशास तसे धोरण…’ युनूस सरकारला लवकरच येणार प्रचिती
भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे सांगितले होते की ऑपरेशन सिंदूर हे केवळ एक ट्रेलर आहे, आणि संपूर्ण चित्र अजून उरलेले आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे. पाकिस्तानी पत्रकार हमीद मीर यांनी देखील भारताकडून संभाव्य मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या मते, भारतीय लष्कराचे संभाव्य लक्ष्य जेएफ-१७ लढाऊ विमाने तयार करणारा कारखाना असू शकतो.या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानने घेतलेला भूमिगत मुख्यालयाचा निर्णय केवळ रक्षणासाठी नसून, भारताच्या अचूक कारवाईमुळे निर्माण झालेल्या मानसिक दबावाचं प्रतिबिंब आहे. यामुळे, भारत-पाक संघर्षाच्या नव्या पर्वाची चाहूल लागली आहे, ज्यावर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.