सुदानमध्ये भूस्खलन; तब्बल 1000 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती, दारफूरमधील अख्खं गाव झालं उद्ध्वस्त
खार्टुम : अफगानिस्तानात सोमवारी शक्तिशाली भूकंप झाला. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता सुदानच्या पश्चिमेकडील दारफूरमध्ये भूस्खलन झाले. या भूस्खलनामुळे तब्बल 1000 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांच्या मुसळधार पावसानंतर तारासीन गावात भूस्खलन झाले. हे गाव मध्य दारफूरच्या माराह पर्वतांच्या मध्यभागी आहे. सध्याच्या काळातील ही सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती मानली जात आहे.
दारफूरच्या गावात राहणाऱ्या जवळपास सर्वच लोकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. सुदान लिबरेशन मूव्हमेंट-आर्मीने म्हटले की, प्राथमिक माहितीनुसार, तारासीन गावात राहणारे जवळजवळ सर्व लोक मृत्युमुखी पडले आहेत. फक्त एकच व्यक्ती वाचली आहे. अंदाजे एक हजार लोकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. यात एक गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय मदत गटांना मदत आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी आणि ढिगाऱ्याखाली गाडलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. येथील स्थानिक माध्यमांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये पर्वतांमधील संपूर्ण भाग सपाट झाल्याचे दिसून येत आहे.
2023 पासून सैन्य आणि आरएसएफमध्ये लढाई सुरू आहे. सुदान आधीच एका भयानक गृहयुद्धाशी झुंजत आहे, असे असताना आता ही नैसर्गिक आपत्ती आली आहे. एप्रिल 2023 पासून राजधानी खार्तूमसह अनेक ठिकाणी देशाच्या सैन्य आणि निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्सेस (आरएसएफ) यांच्यात युद्ध सुरू आहे. लष्कर आणि आरएसएफमधील लढाईमुळे माराह पर्वतांसह दारफूर प्रदेशाचा बराचसा भाग संयुक्त राष्ट्र आणि मदत गटांच्या आवाक्याबाहेर आहे.
हजारो विस्थापित कुटुंबांनी घेतला माराह टेकड्यांमध्ये आश्रय
माराह पर्वत प्रदेशात स्थित सुदान लिबरेशन मूव्हमेंट-आर्मी, दारफूर आणि कोर्डोफानमध्ये सक्रिय असलेल्या अनेक बंडखोर गटांपैकी एक आहे. ते चालू गृहयुद्धात कोणत्याही बाजूशी संलग्न नाही. माराह पर्वत ही अल-फशरच्या नैऋत्येस पसरलेली १६० किमी लांबीची ज्वालामुखी पर्वतरांगा आहे. हा प्रदेश राजधानी खार्तूमपासून सुमारे ९०० किमी अंतरावर आहे आणि संघर्षामुळे विस्थापित झालेल्या हजारो कुटुंबांनी येथे आश्रय घेतला आहे.