Mauritius on red alert as storm 'Garance' disrupts life causing a lockdown-like situation
पोर्ट लुईस : हिंद महासागरातील एक प्रमुख बेट राष्ट्र असलेल्या मॉरिशसवर चक्रीवादळ ‘गॅरेन्स’ ने संकट घोंगावले आहे. वादळाच्या तडाख्यामुळे संपूर्ण देशाला रेड अलर्टवर ठेवण्यात आले असून, विमानतळ बंद करण्यात आले आहे. लोकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे कोविड-19 लॉकडाऊनच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
गॅरेन्स चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मॉरिशस तसेच फ्रेंच बेट ला रियुनियनमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे वादळ ताशी १९५ किमी वेगाने पुढे सरकत आहे आणि त्याचा थेट धोका मॉरिशसला असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. त्यानुसार, नागरिकांना घरीच राहण्याचे आदेश देण्यात आले असून केवळ अत्यावश्यक सेवांसाठी बाहेर पडण्याची परवानगी आहे. चक्रीवादळ बुधवारीच मॉरिशसच्या जवळ आले होते, त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून विमानतळ आणि शाळा बंद करण्यात आल्या. गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता अधिकृतपणे रेड अलर्ट जारी करण्यात आला आणि त्यानंतर संपूर्ण बेटभर भीतीचे वातावरण पसरले. शुक्रवारी पहाटे ४ वाजता हे वादळ मॉरिशसपासून २४५ किमी अंतरावर होते, तर सकाळी ९ वाजता २२७ किमी अंतरावर पोहोचले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Bangladesh Politics: शेख हसीनाचे सरकार नेस्तनाबूत करणाऱ्या विद्यार्थ्याची मोठी घोषणा; बांग्लादेशात पुन्हा येणार राजकीय भूकंप?
चक्रीवादळ गॅरेन्स हे श्रेणी ३ चे तीव्र उष्णकटिबंधीय वादळ असून, त्यात ताशी १६५ ते २२४ किमी वेगाने वारे वाहत आहेत. इतक्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते, झाडे उन्मळून पडू शकतात, तसेच संपूर्ण परिसरात वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस जोरदार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे, त्यामुळे पुराची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. हवामान विभागाने सांगितले की, चक्रीवादळ “धोकादायकपणे मॉरिशसच्या दिशेने सरकत आहे आणि संपूर्ण देशाला त्याचा थेट धोका आहे.” यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि प्रशासनाने त्वरित बचावकार्य सुरू केले आहे.
चक्रीवादळाच्या भीतीमुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर घरगुती वस्तूंची खरेदी करत आहेत. सुपरमार्केट, मेडिकल स्टोअर्स आणि अन्य आवश्यक वस्तूंच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. कोविड-19 लॉकडाऊनच्या काळात जसे नागरिकांनी धावपळ करून खरेदी केली होती, तशीच परिस्थिती पुन्हा एकदा दिसत आहे. एका स्थानिक नागरिकाने सांगितले, “मला वाटले की अजून वेळ आहे, पण मी चुकीचा ठरलो. मला पाणी घ्यायला फक्त १० सेकंद लागले, पण पैसे भरण्यासाठी १० मिनिटे रांगेत उभे राहावे लागले.”तर मेरीव्हॉन लॉरेंट या महिलेने सांगितले की, “माझ्या मुलांसाठी रेड अलर्टच्या काळात खायला पुरेसं अन्न असावं, म्हणून मी फ्रोझन पफ पेस्ट्री, अंडी आणि साखर खरेदी केली.”
चक्रीवादळामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या मच्छीमारांनी आपल्या बोटी सुरक्षित स्थळी हलवल्या आहेत. शेतकऱ्यांनी हरितगृह झाकून ठेवली आहेत, जेणेकरून त्यांचे पीक वाचवता येईल. फ्रेंच बेट ला रियुनियननेही विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या बेटावर याआधी जानेवारी २०२४ मध्ये ‘बेलाल’ चक्रीवादळाने मोठा हाहा:कार माजवला होता, ज्यात ४ लोकांचा मृत्यू झाला आणि १०० दशलक्ष युरोंचे नुकसान झाले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : तिसरं महायुद्ध अटळ? उत्तर कोरियाने पुन्हा एकदा जगाला दिला युद्धाचा इशारा
२०११ च्या आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य अहवालानुसार मॉरिशसची लोकसंख्या सुमारे ४८% हिंदू आहे. देश अलर्ट मोडवर असून, सर्व नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वादळाच्या भीषणतेमुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता असून, पुढील काही तासांतच या वादळाचा संपूर्ण प्रभाव समोर येईल. संपूर्ण मॉरिशस आणि ला रियुनियनमध्ये रेड अलर्ट लागू असल्यामुळे प्रशासन सतर्क आहे, नागरिकांनी संयम बाळगून सुरक्षिततेच्या उपाययोजना कटाक्षाने पाळाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.