
Nepal Flash flood: नेपाळमधील देविघाटमध्ये महापुराची दुसरी लाट; दूषित पाणी आणि साथीच्या आजारांचा मोठा धोका
चिखल आणि ढिगाऱ्यांमुळे बचावकार्यात अडथळे
पुराच्या पाण्याचा वेग आणि मोठ्या प्रमाणावर वाहून आलेल्या चिखलामुळे बचाव पथकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल वाहून गेल्याने घटनास्थळी पोहोचणे कठीण झाले आहे. त्यामुळे काही भागांत मदत आणि बचावकार्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येत आहे. लष्कर, सुरक्षा दल तसेच स्थानिक पथके बचावकार्यात सहभागी झाली आहेत. खराब हवामानामुळे काही भागांत मदतकार्याचा वेगही मंदावला दिसुन येत आहे.
देविघाटमध्ये ढिगारे हटवून शोधमोहीम
देविघाट परिसरात पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. बचाव पथके चिखल हटवून संभाव्य ठिकाणी शोधमोहीम राबवत आहेत. मात्र, सतत बदलणारे हवामान आणि नव्या पुराचा धोका यामुळे बचावकार्य करताना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे. नव्याने तयार झालेल्या हिमतळ्यामुळे पुन्हा पूर येण्याची शक्यता व्यक्त केला जात असल्याने काही काळ बचावकार्य थांबवावे लागले होते.
पाणी, अन्न आणि औषधांची टंचाई
या नैसर्गिक आपत्तीमुळे नेपाळच्या अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरे, पूल आणि रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता व्यवस्थेलाही मोठा फटका बसला असून, पूरग्रस्त नागरिकांना स्वच्छ पाणी, अन्न आणि औषधांची गरज भासत आहे. पुराचे पाणी ओसरल्यानंतर दूषित पाण्यामुळे जलजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हजारो नागरिक झाले बेपत्ता
याच दरम्यान, महापुरात मृतांची संख्या वाढत असून हजारो नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये अनेक कामगार अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्यापर्यंत ऑक्सिजन, पाणी आणि अन्न पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथके युद्धपातळीवर काम करताना दिसून येत आहेत. भारत, चीन आणि इतर देशांकडूनही मदतकार्य सुरू आहे.
पुनर्वसनाचे नागरीकांसमोर मोठे आव्हान
पुरानंतर देविघाटसह प्रभावित भागांमध्ये केवळ बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणेच नव्हे, तर नागरिकांना सुरक्षित निवारा, स्वच्छ पाणी, अन्न आणि वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. पूरग्रस्त भागातील रस्ते आणि पूल पुन्हा सुरू करणे, वीज व पाणीपुरवठा सुरळीत करणे आणि विस्थापित नागरिकांचे पुनर्वसन करणे यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे बचावकार्याबरोबरच मदत आणि पुनर्वसनाच्या कामालाही वेग देण्याची गरज निर्माण झाली आहे.