Pakistan-Afghanistan conflict Air strikes create war-like situation
Pakistan Air Strike : पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या शेजारी देशांमधील तणाव पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. पाकिस्तानने सोमवारी सकाळी अफगाणिस्तानातील खोस्त आणि नांगरहार प्रांतात मोठे हवाई हल्ले केले. पाकिस्तानी हवाई दलाने केलेल्या या कारवाईत मुलांसह किमान ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. डुरंड रेषेजवळ झालेल्या या कारवाईमुळे दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती अधिकच तीव्र झाली आहे.
पाकिस्तानी सुरक्षा सूत्रांच्या माहितीनुसार, या हवाई हल्ल्यांचा उद्देश तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि हाफिज गुल बहादूर गट यांच्या अड्ड्यांना उद्ध्वस्त करणे हा होता. हे दोन्ही गट पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा प्रांत आणि सीमावर्ती भागात सक्रिय आहेत. गेल्या काही वर्षांत टीटीपीने पाकिस्तानवर मोठे हल्ले चढवले असून, शेकडो सैनिक आणि नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. २०२१ मध्ये अफगाणिस्तानात तालिबानचे पुनरागमन झाल्यानंतर या दहशतवादी संघटनांना अधिक बळ मिळाल्याचा दावा पाकिस्तान करत आहे. तालिबानच्या सावलीत टीटीपीने पाकिस्तानात हल्ल्यांची मालिका सुरू केली आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकार आणि लष्कराला सतत दबावाखाली राहावे लागत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Minneapolis school shooting : अमेरिकेतील शाळेत पुन्हा एकदा गोळीबार; मिनियापोलिस येथील हृदयद्रावक घटनेने देश हादरला
पाकिस्तान सरकार सातत्याने अफगाण तालिबानवर टीका करत आहे. त्यांचा आरोप आहे की अफगाणिस्तानातील तालिबान सरकार टीटीपीसह अनेक दहशतवादी गटांना आश्रय देते. त्याचबरोबर पाकिस्तानचा दावा आहे की भारतीय गुप्तचर संस्था देखील अफगाणिस्तानात सक्रिय असून पाकिस्तानविरोधी गटांना पाठिंबा देत आहेत. यावर अफगाण तालिबानने ठाम भूमिका घेतली आहे. तालिबान प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले असून, त्यांनी स्पष्ट केले आहे की ते कोणत्याही परकीय शक्तीला समर्थन करत नाहीत. उलटपक्षी, त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे की – “आमच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करू नका.”
Our sources, along with the pictures they sent, confirmed airstrikes on TTP militant outposts in Nangarhar and Khost provinces of Afghanistan. According to locals, these drones came from Pakistan.
I hope no civilians were harmed in these airstrikes and that only the TTP… pic.twitter.com/x21A7V7E82
— Ahmad Sharifzad (@AhmadSharifzad) August 27, 2025
credit : social media
पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी याआधीच स्पष्ट केले होते की जर अफगाणिस्तानाने दहशतवाद्यांवर नियंत्रण ठेवले नाही, तर पाकिस्तान स्वतः कारवाई करेल. सोमवारी झालेले हवाई हल्ले हे त्या इशाऱ्याचीच अंमलबजावणी मानली जात आहे. पाकिस्तानने दहशतवाद रोखण्यासाठी कठोर पावले उचलली नसल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.
या हल्ल्यांनंतर अफगाण तालिबान नेत्यांनी पाकिस्तानविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. त्यांचे म्हणणे आहे की पाकिस्तानचे हे पाऊल हे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन आहे. तालिबान नेत्यांनी स्पष्ट केले की त्यांच्या भूमीत घडणाऱ्या अशा हल्ल्यांना ते गप्प बसून सहन करणार नाहीत.
अलीकडेच पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयने पाकिस्तानातील तालिबानविरोधी अफगाण गटांची बैठक घेतली होती. तालिबान सरकारने याकडे त्यांच्या सत्तेला अस्थिर करण्याचा कट म्हणून पाहिले आहे. त्यामुळे आधीपासूनच तणावग्रस्त असलेले संबंध आता पूर्णपणे बिघडले आहेत. हवाई हल्ल्यांनंतर परिस्थिती अधिक धोकादायक झाली असून, दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश वातावरण निर्माण झाले आहे. जर हा संघर्ष थांबला नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण दक्षिण आशियाई भूभागावर होऊ शकतो. कारण पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे दोन्ही देश आधीच आर्थिक व सामाजिक संकटांनी ग्रस्त आहेत. अशा वेळी युद्धाचा धोका त्यांच्या लोकांसाठी आणखी विनाशकारी ठरू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 128 वर्षांपूर्वी डोके नेले होते कापून, ट्रॉफीसारखे सजवले; आता फ्रान्सने परत केली ‘या’ देशाच्या राजाची कवटी
भारत, चीन, रशिया यांसारख्या देशांचे या परिस्थितीकडे बारकाईने लक्ष लागले आहे. कारण पाकिस्तान-आफगाणिस्तानातील संघर्ष हा फक्त सीमावर्ती प्रश्न नाही, तर तो संपूर्ण प्रादेशिक सुरक्षेला आणि जागतिक दहशतवादविरोधी लढाईलाही मोठा धोका आहे. पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांनी पाकिस्तान-आफगाणिस्तानातील तणाव टोकाला पोहोचवला आहे. एका बाजूला पाकिस्तान दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करत असल्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे अफगाण तालिबान सार्वभौमत्वाच्या उल्लंघनाचा आरोप करत आहे. परिस्थिती कुठे थांबेल हे सांगता येत नाही, पण इतके निश्चित आहे की या संघर्षाने दक्षिण आशियात नवे संकट उभे केले आहे.