अमेरिकेतील शाळेत गोळीबार, ३ जणांचा मृत्यू, गोळीबार करणारा ठार; ट्रम्प यांनाही माहिती देण्यात आली ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Minneapolis school shooting : अमेरिकेत पुन्हा एकदा शाळेत झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. बुधवारी (२७ ऑगस्ट २०२५) सकाळी मिनियापोलिस येथील अॅन्युन्सिएशन कॅथोलिक स्कूलमध्ये हा भीषण हल्ला घडला. सकाळच्या प्रार्थना सभेदरम्यान झालेल्या या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असून तब्बल २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये हल्लेखोराचाही समावेश असल्याचे अमेरिकेच्या न्याय विभागाने पुष्टी केली आहे.
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, सकाळी मुले शाळेच्या प्रार्थना सभेसाठी हॉलमध्ये जमली असताना हल्लेखोराने अचानक गोळीबार सुरू केला. प्रार्थना आणि शांततेचे वातावरण काही क्षणांतच किंकाळ्यांनी, भीतीने आणि रक्ताने भरून गेले. मुलांनी आणि शिक्षकांनी जीव वाचवण्यासाठी धावपळ केली. शाळा परिसरात क्षणातच गोंधळ माजला.
अॅन्युन्सिएशन कॅथोलिक स्कूल ही मिनियापोलिसच्या आग्नेय भागात स्थित असून प्री-स्कूलपासून आठवीपर्यंतच्या सुमारे ३९५ विद्यार्थ्यांचे शिक्षण येथे चालते. एका शाळेशी संबंधित अधिकाऱ्याने सांगितले की, “पोलिस आणि रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. शेकडो पालक तातडीने शाळेकडे धावले आणि त्यांचा थरार शब्दात सांगता येणार नाही.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia-Ukraine War : रशिया-युक्रेनच्या पुढील बैठकीबाबत सस्पेन्स कायम; पुतिनच्या खास माणसाने दिली मोठी खबर
मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वॉल्झ यांनी या घटनेला “अत्यंत भयानक आणि वेदनादायक” असे संबोधले. त्यांनी सांगितले की,
“मुलांचा आणि शिक्षकांचा पहिला शाळेचा आठवडा अशा हिंसाचाराने खराब होणे हे हृदयद्रावक आहे. आम्ही जखमींना लवकर बरे होण्यासाठी आणि मृतांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतो.”
मिनियापोलिसचे महापौर जेकब फ्रे यांनी या हल्ल्याचे वर्णन करताना भावनिक प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,
“ही घटना कल्पनेपलीकडील आहे. वेदना व्यक्त करण्यासाठी शब्दच अपुरे आहेत. ह्या मुलांना तुमची स्वतःची मुले समजा. अनेक पालकांनी आपल्या लेकरांना गमावले आहे.”
सीएनएनच्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या घटनेबाबत तातडीने माहिती देण्यात आली आहे. व्हाईट हाऊस सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. स्वतः ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिले की –
“एफबीआय तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे आणि आवश्यक कारवाई करत आहे. या दुर्दैवी घटनेत प्रभावित झालेल्या सर्वांसाठी मी प्रार्थना करतो.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 128 वर्षांपूर्वी डोके नेले होते कापून, ट्रॉफीसारखे सजवले; आता फ्रान्सने परत केली ‘या’ देशाच्या राजाची कवटी
अमेरिकेत शाळेत गोळीबाराच्या घटना वारंवार घडत आहेत आणि त्यामुळे मुलांचे भविष्य, पालकांची सुरक्षितता आणि समाजातील हिंसाचार या प्रश्नांवर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. केवळ मिनियापोलिसच नव्हे तर देशातील अनेक राज्यांमध्ये शाळा, कॉलेज आणि धार्मिक स्थळांवर अशा घटनांमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला आहे शिक्षणाच्या मंदिरांमध्ये मुले खरोखर किती सुरक्षित आहेत? निष्पाप बालकांच्या प्रार्थना सभेत घडलेली ही रक्तरंजित घटना केवळ अमेरिकेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरवून सोडणारी ठरली आहे.