Pakistani man claims they're ahead of India in defense gets mocked online
इस्लामाबाद : पाकिस्तानातील एका युट्यूबरच्या व्हिडीओमुळे सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. पाकिस्तानच्या युट्यूबर शोएब चौधरी यांनी नागरिकांशी संवाद साधताना १९७१ च्या युद्धात झालेल्या पराभवावर आणि बांगलादेशच्या माफीच्या मागणीवर प्रतिक्रिया जाणून घेतली. मात्र यावेळी एका व्यक्तीने भारताच्या लष्करापेक्षा पाकिस्तानचं लष्कर बलवान असल्याचा दावा करताच, त्याला समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे.
पाकिस्तानने १९७१ मध्ये झालेल्या युद्धात बांगलादेश (माजी पूर्व पाकिस्तान) मध्ये केलेल्या अत्याचाराबाबत माफी मागावी, अशी मागणी बांगलादेश सरकारने अधिकृतपणे केली आहे. या पार्श्वभूमीवर शोएब चौधरी यांनी सामान्य जनतेला विचारले की, पाकिस्तानने माफी मागावी का? लोकांच्या प्रतिक्रिया संमिश्र होत्या. काहींनी या मागणीला पाठिंबा दिला, काहींनी याला विरोध केला. पण चर्चा गाजली ती एका वकिलाच्या वक्तव्यामुळे. त्या व्यक्तीने म्हटले की, “आपले लष्कर भारत, चीन आणि रशियापेक्षा अधिक मजबूत आहे. आपल्याकडे खूप ताकद आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भूकंपाने अफगाणिस्तान हादरले, जम्मू-काश्मीरपर्यंत जाणवले धक्के; तीव्रता 5.9 रिश्टर स्केलवर
या विधानावरच दुसऱ्या एका नागरिकाने त्याला थेट सवाल केला, “जर आपले लष्कर खरोखरच चीन, भारत आणि रशियापेक्षा बलवान असेल, तर आपण आजवर एकही युद्ध का जिंकू शकलो नाही?” त्याने पुढे उपहासात्मक शैलीत म्हटले की, “जर ते खरंच असतं, तर आपण चंद्रावर पोहोचलो असतो!” हा संवाद ऐकताच गर्दीत उपस्थित नागरिक हसून दाद देऊ लागले. सोशल मीडियावरही लोकांनी यावर विनोदांचे आणि उपहासपूर्ण प्रतिक्रियांचे स्फोट केले. अनेकांनी म्हटले की, पाकिस्तान अजूनही वास्तव स्वीकारत नाही आणि इतिहासाचे खरे दर्शन घ्यायला तयार नाही.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात स्वातंत्र्यानंतर चार प्रमुख युद्धे झाली आहेत:
1. 1947-48 चे युद्ध: काश्मीरच्या मुद्यावरुन झालेलं हे पहिले युद्ध होतं.
2. 1965 चे युद्ध: हे युद्ध 17 दिवस चालले आणि दोन्ही बाजूंना मोठं नुकसान झालं.
3. 1971 चे युद्ध: या युद्धात भारताने निर्णायक विजय मिळवला. सुमारे 15,000 चौरस किलोमीटर पाकिस्तानी जमीन भारतीय सैन्याने ताब्यात घेतली होती आणि पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांगलादेश बनला.
4. 1999 कारगिल युद्ध: हे पाकिस्तानसाठी सर्वात लज्जास्पद पराभवांपैकी एक मानले जाते. भारतीय सैन्याने पाकिस्तानी घुसखोरांना परत ढकलले आणि उंच पर्वतशिखरांवर कब्जा मिळवला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : श्रीलंकेचा भारताभिमुख निर्णय; उचलले ‘असे’ पाऊल पाकिस्तान पडला तोंडावर
ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या व्हिडीओचे क्लिप्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. नेटकऱ्यांनी वकिलाच्या वक्तव्याला “वास्तवापासून दूर” आणि “स्वप्नातले जग” असे संबोधले आहे. काहींनी लिहिले की, “इतिहास शिकला असता, तर असे बोलले नसते.” तर काहींनी कारगिल युद्धात भारतीय जवानांनी लढवलेली शौर्यगाथा सांगताना लिहिले की, “भारताचे जवान लाहोरपर्यंत पोहोचले आणि चहा प्याले, हे विसरता कामा नये.”
या घटनेने पुन्हा एकदा हे स्पष्ट केले की इतिहासाचा अभ्यास आणि वास्तवाची स्वीकारार्हता कोणत्याही राष्ट्रासाठी अत्यावश्यक आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आजच्या तरुण पिढीला सत्य माहिती सहज उपलब्ध होत आहे, आणि चुकीच्या गोष्टींवर त्वरित प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. पाकिस्तानमधील नागरिकांमध्ये विचारमंथन होत असल्याची ही घटना एक सकारात्मक बाब असली तरी, त्यासाठी स्वत:च्या चुका स्वीकारण्याची तयारीही तितकीच महत्त्वाची आहे.