
हाफिज सईदच्या कार्यालयात पाकिस्थान मंत्र्याची हजेरी! (Photo Credit - X)
Pakistan Minister Terror link: पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या सरकारचा दहशतवाद्यांशी असलेला संबंध पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर उघड झाला आहे. पंजाब प्रांताच्या एका राज्यमंत्र्याने गुरुवारी लश्कर-ए-तैयबाचा म्होरक्या हाफिज सईद याच्या प्रतिबंधित संघटना ‘जमात-उद-दावा’ च्या राजकीय आघाडीच्या (पाकिस्तान मरकझी मुस्लिम लीग – PMML) कार्यालयाला भेट दिली. सरकारच्या या कृतीमुळे हाफिज सईदच्या संघटनेला ‘अधिकृत संरक्षण’ मिळत असल्याचे स्पष्ट झाले असून, पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी दाव्याची पोलखोल झाली आहे.
राज्यमंत्री तलाल चौधरी हाफिज सईदच्या दारात
पाकिस्तानचे राज्यमंत्री आणि सिनेटर तलाल चौधरी यांनी लाहोरपासून सुमारे १३० किलोमीटर दूर असलेल्या फैसलाबाद येथील PMML च्या कार्यालयात पोहोचले. तेथे PMML च्या नेत्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले.
हाफिज सईद कोण?
हाफिज सईद हा २००८ च्या मुंबई हल्ल्यांचा मास्टरमाइंड आहे. तो अनेक दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरणांमध्ये दोषी ठरलेला आहे आणि २०१९ पासून लाहोरच्या क्वेटा लखपत जेलमध्ये बंद आहे.
दौरा कशासाठी?
आंतरराष्ट्रीय दबाव असूनही सईदची राजकीय शाखा सक्रिय आहे. PMML ने जारी केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, चौधरींनी पक्षाच्या नेतृत्वाशी सविस्तर चर्चा केली. चर्चा ‘सध्याचे राजकीय वातावरण आणि प्रमुख राष्ट्रीय मुद्दे’ यावर केंद्रित होती.
दहशतवाद्यांकडून ‘राष्ट्रीय एकतेत’ साथ
या बैठकीनंतर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “दोन्ही बाजूंनी राष्ट्रीय एकता, राजकीय स्थिरता आणि लोकशाही प्रक्रिया सुरू ठेवण्यावर भर दिला.” सध्याच्या परिस्थितीत सर्व राजकीय पक्षांनी सद्भाव वाढवण्यासाठी आणि संस्थांना मजबूत करण्यासाठी सामूहिक दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज आहे, असेही यात नमूद आहे. हा असा पहिलाच प्रकार नाही. यापूर्वी पंजाब विधानसभेचे अध्यक्ष मलिक अहमद खान यांनीही कसूर जिल्ह्यात PMML च्या एका रॅलीत भाग घेऊन हाफिज सईदची स्तुती केली होती.
तीव्र निंदा आणि टीका
विरोधकांकडून टीका या घटनांना ‘दहशतवादाला प्रोत्साहन’ देत असल्याचे सांगत विरोधी पक्षांनी शरीफ सरकारची तीव्र निंदा केली आहे. एका नेत्याने “यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर पाकिस्तानच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल,” असे म्हटले आहे.
भारताची भूमिका
भारतानेही या घटनेची कडक निंदा करत याला ‘दहशतवादाप्रती नरमी’चा स्पष्ट पुरावा ठरवले आहे. तज्ज्ञांच्या मते, शरीफ सरकार राजकीय बळकटीसाठी कट्टरपंथी गटांशी जवळीक वाढवत आहे, जो देशाच्या अंतर्गत सुरक्षेसह परराष्ट्र धोरणांसाठीही धोकादायक आहे. फैसलाबाद दौऱ्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत आणि सरकारचे मौन अनेक प्रश्नचिन्हे निर्माण करत आहे. हा केवळ एक राजकीय डाव आहे की दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचा नवा सरकारी कट, असा प्रश्न उपस्थित होत आहे.