
planet y ninth planet discovery in solar system
शास्त्रज्ञांना सूर्यमालेच्या बाह्य भागात ‘प्लॅनेट Y’ नावाच्या अज्ञात ग्रहाचे संकेत मिळाले.
हा ग्रह पृथ्वीपेक्षा लहान, पण बुधापेक्षा मोठा असण्याची शक्यता व्यक्त.
व्हेरा सी. रुबिन वेधशाळेच्या नव्या दुर्बिणीतून पुढील काही वर्षांत याची पुष्टी होऊ शकते.
मानवजातीने हजारो वर्षे आकाशातील ग्रह-तारे (Planets and stars) ओळखत आले आहेत, पण अद्याप विश्वाचे अनेक गूढ उकलायचे बाकी आहे. आता शास्त्रज्ञांनी सूर्यमालेच्या सीमेपलीकडे एका ‘प्लॅनेट Y’ (Planet Y) नावाच्या संभाव्य नव्या ग्रहाचे संकेत शोधून काढले आहेत. हा ग्रह प्रत्यक्षात पाहिला गेला नसला तरी, त्याच्या अस्तित्वाचे पुरावे गणिती आणि खगोलभौतिकीय निरीक्षणांतून मिळत आहेत.
अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातील खगोलभौतिकशास्त्रज्ञ अमीर सिराज आणि त्यांच्या संशोधन टीमने हा गाजलेला अभ्यास प्रसिद्ध केला आहे. त्यांच्या मते, नेपच्यूनच्या कक्षेपलीकडे असलेल्या बर्फाळ पिंडांच्या (Kuiper Belt Objects) कक्षांमध्ये आढळणारे विचित्र झुकाव हे एका अज्ञात शक्तीच्या प्रभावाचे द्योतक असू शकतात आणि ती शक्ती म्हणजेच प्लॅनेट Y असण्याची शक्यता आहे. हे वस्तू ज्या पद्धतीने परिभ्रमण करतात, त्यातून असे दिसते की, एखादा ग्रह त्यांच्या गुरुत्वाकर्षणावर परिणाम करत आहे. यामुळेच या नव्या ग्रहाच्या अस्तित्वाविषयी संशोधकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : S400 Theft : रशियन S-400 तंत्रज्ञान चोरण्याच्या प्रयत्नानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले; रशियाने बसवली जबर वचक
संशोधकांचे मत आहे की प्लॅनेट Y हा आकाराने बुधापेक्षा मोठा आणि पृथ्वीपेक्षा लहान असू शकतो. तो अत्यंत थंड, बर्फाळ आणि सूर्यापासून अब्जो किलोमीटर दूर असलेला ग्रह असेल. या ग्रहावर सूर्यकिरणे अत्यंत क्षीण प्रमाणात पोहोचतात, त्यामुळे तो आकाशात जवळजवळ न दिसणारा काळोखाचा बिंदू असू शकतो. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा ग्रह सूर्यमालेतील इतर ग्रहांच्या तुलनेत अत्यंत झुकलेल्या कक्षेत परिभ्रमण करत असू शकतो. त्यामुळे त्याचा शोध घेणे तांत्रिकदृष्ट्या फार अवघड आहे.
आगामी काही वर्षांत हा रहस्यभेद होण्याची शक्यता वाढली आहे. व्हेरा सी. रुबिन वेधशाळा या अत्याधुनिक दुर्बिणीच्या माध्यमातून रात्रीच्या आकाशाचे १० वर्षांचे सर्वेक्षण सुरू होणार आहे. या सर्वेक्षणादरम्यान जर प्लॅनेट Y वेधशाळेच्या दृश्य क्षेत्रात आला, तर शास्त्रज्ञ त्याचा प्रत्यक्ष शोध घेऊ शकतील. अभ्यासाचे प्रमुख लेखक अमीर सिराज यांनी सांगितले, “माझ्या मते पुढील दोन ते तीन वर्षांत हा ग्रह सापडण्याची शक्यता आहे. एकदा तो दुर्बिणीच्या नजरेत आला, की आपल्याला सौरमालेबद्दलच्या अनेक रहस्यांचे उत्तर मिळेल.”
कुइपर बेल्ट हा सूर्यमालेच्या बाह्य भागातील बर्फाळ व अंधारमय प्रदेश आहे. इथे असंख्य खगोलीय वस्तू, बर्फाचे पिंड आणि बटुग्रह फिरत असतात. हाच प्रदेश म्हणजे प्लूटोचे घर. प्लूटो एकेकाळी सूर्यमालेचा नववा ग्रह म्हणून ओळखला जात होता, परंतु 2006 मध्ये त्याला बटुग्रह (Dwarf Planet) म्हणून वर्गीकृत करण्यात आले. आता, प्लॅनेट Y च्या शोधामुळे पुन्हा एकदा “नववा ग्रह” हा पदवीप्राप्तीचा वाद पुनर्जीवित होऊ शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Delhi Bomb Blast : लाल किल्ल्याजवळील भीषण स्फोटानंतर मुस्लिम जगाचं मोठं विधान; सौदी-युएई-इराणची अनपेक्षित प्रतिक्रिया
जर प्लॅनेट Y खरोखर अस्तित्वात असेल, तर हे केवळ सूर्यमालेच्या अभ्यासातील नव्या पर्वाची सुरूवात ठरेल. हे आपल्या सौरमालेच्या सीमारेषेपलीकडील एक अद्भुत जग असेल, जे मानवी कल्पनेच्या पलीकडील वास्तव उलगडेल. सूर्य, ग्रह, उपग्रह आणि तारकांच्या या अनंत विश्वात, कदाचित कुठेतरी आणखी एक जग शांततेत फिरत आहे आपल्याला त्याचे अस्तित्व ओळखायचे आहे इतकेच.