मॉस्को : पाश्चात्य देश आणि अमेरिकेने लादलेल्या आर्थिक निर्बंधांमुळे (Economic Sanctions) रशियाच्या अडचणी (Russia’s Troubles) दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा परिस्थितीत रशियाने भारताला आयात प्रतिस्थापनेचा (Import Replacement) मोठा प्रस्ताव दिला आहे. भारताचे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि रशियाचे युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (UAC) परदेशी घटकांसह संयुक्तपणे सुखोई सुपरजेट तयार करण्यासाठी चर्चा सुरु आहे.
युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे महासंचालक युरी बी. स्लूसर यांनी याला दुजोरा दिला आहे. ‘एरो इंडिया शो 2023’ दरम्यान, स्लूसरने सांगितले की, रशियामध्ये रशियन घटकांसह आणि भारतात परदेशी घटकांच्या मदतीने सुखोई सुपरजेट तयार करण्याची योजना आहे. युक्रेनसोबतच्या युद्धामुळे अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत.
रशियाचा प्रस्ताव काय?
गेल्या आठवड्यात बंगळुरू येथे आयोजित ‘एरो इंडिया शो 2023’ दरम्यान, युरी बी. स्लूसर म्हणाले, ‘आम्ही एका भारतीय कंपनीला (HAL) सुखोई सुपरजेटच्या परदेशी घटकांसह संयुक्तपणे भारतात उत्पादन करण्याची ऑफर दिली आहे. ते फार लवकर होऊ शकेल. असे म्हटले आहे. सुपरजेट -100 हे 100 आसनी प्रवासी विमान आहे. हे सुखोई कॉर्पोरेशनने डिझाइन आणि विकसित केले आहे. मात्र, सुखोईचे आता युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (यूएसी) मध्ये विलीनीकरण करण्यात आले आहे.
सुखोई अपग्रेडबाबत रशियाशी चर्चा सुरू
सुखोई-30 MKI च्या अपग्रेडेशनसाठी भारत आणि रशिया यांच्यात काही काळापासून चर्चा सुरू आहे. जेणेकरून फायटर प्लेनला उत्तम रडार, एव्हीओनिक्स आणि शस्त्रे पुरवता येतील. यावर स्लूसर यांनी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असल्याचे म्हटले आहे. त्यांनी फक्त तांत्रिक सुधारणा करण्याबाबत माहिती दिली आहे. आम्ही HAL सोबत भारतात बरेच अपग्रेड करण्याची योजना आखत आहोत. अपग्रेडेशन आणि टेस्टिंग भारतातच व्हायला हवं हे भारतासाठी खूप महत्त्वाचं आहे.