Russia strikes Ukraine Zelensky’s big announcement
रशियाने युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला केला; ८०० हून अधिक ड्रोन व क्षेपणास्त्रांचा वापर.
झापोरिझ्झियामध्ये २० हून अधिक इमारती उद्ध्वस्त, अनेक नागरिक जखमी; २ मुलांसह किमान २ मृत्यू.
झेलेन्स्कींचे आवाहन, युरोपने आता बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली उभारलीच पाहिजे.
Russian missile strike video : रशिया–युक्रेन युद्धाला साडेतीन वर्षांहून अधिक काळ उलटला. जग थकले, राष्ट्रे चर्चेने कंटाळली, पण रणभूमीवर अजूनही क्षणाक्षणाला रक्त सांडतेय. रशियाचे हवाई हल्ले दिवसेंदिवस तीव्र होत आहेत, आणि युक्रेनसाठी ही झुंज फक्त सीमारेषेची उरलेली नाही तर प्रत्येक सामान्य नागरिकाच्या अस्तित्वाची झाली आहे.
मंगळवारी रशियन सैन्याने युक्रेनच्या झापोरिझ्झिया प्रदेशावर प्रचंड बॉम्बहल्ला केला. १०० पेक्षा जास्त ड्रोन आणि सुमारे १५० ग्लाइड बॉम्ब यावेळी डागण्यात आले. या हल्ल्यात २ मुलांसह १३ जण जखमी, तर १ व्यक्तीचा मृत्यू झाला. शहरात २० हून अधिक अपार्टमेंट इमारती उद्ध्वस्त झाल्या. अनेक ठिकाणी आग लागल्यामुळे रहिवाश्यांच्या आयुष्यभराच्या उभारीचा क्षणात राख झाला. प्रादेशिक प्रमुख इव्हान फेडोरोव्ह यांनी सांगितले की, “ऑगस्टच्या अखेरीस झालेल्या हल्ल्यांमधून शहर अजून सावरलेही नव्हते. दुरुस्ती सुरू असतानाच आता शत्रूने आणखी हल्ला केला.” या शब्दांतून परिस्थितीची गंभीरता स्पष्ट होते.
रशियन सैन्य उंचावरून ग्लाइड बॉम्ब टाकते. हे बॉम्ब लढाऊ विमानांतून सुटले की थेट जमिनीवर कोसळतात आणि भयानक स्फोट घडवतात. युक्रेनकडे या शस्त्रास्त्रांविरुद्ध प्रभावी संरक्षण नाही. म्हणूनच प्रत्येक हल्ला विनाशक ठरत आहे. झेलेन्स्की यांनी यावर भर देत सांगितले, “रशियाला आर्थिक व राजनैतिक नुकसान सहन करावे लागले नाही, तोपर्यंत युद्ध संपणार नाही. म्हणूनच आम्हाला हवाई संरक्षणात गुंतवणूक करावीच लागेल.”
हे देखील वाचा : Happy Birthday PM Modi: ‘मी नरेंद्र दामोदरदास मोदी…’; संघर्षातून शिखरावर पोहोचलेल्या भारताच्या पंतप्रधानांचा प्रेरणादायी प्रवास
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी टेलिग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन आठवड्यांतच रशियाने युक्रेनवर ३५०० ड्रोन, २५०० हून अधिक ग्लाइड बॉम्ब आणि २०० क्षेपणास्त्रे डागली आहेत. इतक्या भीषण प्रमाणात होणारे हल्ले युक्रेनच्या संरक्षक व्यवस्थेला हादरवून सोडत आहेत. झेलेन्स्की यांनी स्पष्टपणे सांगितले की “युरोपच्या आकाशाचे रक्षण करण्यासाठी बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली उभारण्याची वेळ आली आहे. तंत्रज्ञान आहे, साधने आहेत, पण दृढ इच्छाशक्ती आणि भागीदारांचा निर्धार हवा.”
A typical day for Russia, which, unfortunately, continues to avoid truly strong global pressure in response to prolonging the war.
At night, there was a series of brutal rocket artillery and aerial bomb strikes on Zaporizhzhia – against ordinary homes and city infrastructure.… pic.twitter.com/CblmPrPVhZ
— Volodymyr Zelenskyy / Володимир Зеленський (@ZelenskyyUa) September 16, 2025
credit : social media
अलीकडील हल्ल्यांमध्ये रशियाने राजधानी कीववरही लक्ष केंद्रीत केले. ८०० हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून रशियाने कीवमधील सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या भागातील प्रमुख प्रशासकीय इमारतींवर लक्ष्य साधले. दोन क्रूझ क्षेपणास्त्रांनी इमारतींना थेट तडाखा दिला आणि आग लागली. सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परिसरात अशा प्रकारे विनाश झाल्यामुळे नागरिकांचा आत्मविश्वास ढासळत आहे.
युद्धाचा फटका फक्त रणांगणावर नाही, तर प्रत्येक सामान्य नागरिकाच्या जीवनावर बसला आहे. झापोरिझ्झियामधील घरांच्या अवशेषांतून लोक आपली मातीमोलाची कागदपत्रे, फोटो अल्बम्स शोधताना दिसतात. मुलांचे रडणे, रुग्णालयांतील गर्दी आणि निर्वासितांचे ओसंडून वाहणारे तंबू – या सगळ्याने युक्रेनच्या जखमा अधिक खोल झाल्या आहेत. एका महिलेने स्थानिक माध्यमांना सांगितले, “आम्ही रात्री झोपतो तेव्हा माहित नसते की सकाळी उठू का? हे फक्त युद्ध नाही, तर आमच्या अस्तित्वावरील प्रश्न आहे.”
झेलेन्स्कींचा सूर आता केवळ आपल्या देशापुरता मर्यादित नाही. ते स्पष्ट सांगतात की, “आज जर युक्रेन हरला, तर उद्या रशियाचे क्षेपणास्त्र युरोपच्या इतर देशांच्या आकाशात उडतील.” त्यामुळेच ते सातत्याने युरोपियन नेत्यांना आवाहन करत आहेत की एकत्र येऊन संरक्षणात्मक भिंत उभी करावी.
हे देखील वाचा : modi @75 : Thank You माझ्या मित्रा… ट्रम्प यांनी मोदींना वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा; पंतप्रधानांनीही दिले ‘असे’ उत्तर
लष्करी तज्ञांच्या मते, रशियाची रणनीती स्पष्ट आहे नागरिकांना लक्ष्य करून मानसिक दबाव निर्माण करणे. सतत ड्रोन, क्षेपणास्त्र व बॉम्ब वर्षाव करून युक्रेनियन जनतेला थकवायचे आणि सरकारवर दबाव आणायचा. मात्र, युक्रेनियन नागरिकांची जिद्द अजूनही अढळ आहे. रशिया–युक्रेन संघर्ष आता केवळ दोन राष्ट्रांचा प्रश्न राहिला नाही. तो संपूर्ण युरोपच्या सुरक्षेशी जोडला गेला आहे. झापोरिझ्झियापासून कीवपर्यंत, प्रत्येक हल्ला केवळ विटा–सिमेंट उडवत नाही तर लोकांच्या मनांवर खोल जखमा सोडतो. झेलेन्स्की यांचे “वेळ आली आहे…” हे विधान फक्त युक्रेनसाठी नाही, तर संपूर्ण खंडासाठी एक इशारा आहे. पुढील पावले युरोपियन नेत्यांच्या निर्णयक्षमतेवर अवलंबून आहेत.