अफगाणिस्तानात साखळी बॉम्बस्फोट; एकामागून एक स्फोटांनी हादरले काबुल, सुरक्षा यंत्रणांचा तपास सुरु...
काबुल : अफगाणिस्तानात पाकिस्तानकडून ‘एअर स्ट्राईक’ करण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एकामागून एक स्फोट झाल्याचे पाहिला मिळाले. काबुलच्या अब्दुल हक स्क्वेअरजवळ हा स्फोट झाला, जिथे एका लँड क्रूझर वाहनाला लक्ष्य करण्यात आले. या घटनेनंतर अब्दुल हक स्क्वेअर बंद होता, ज्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
पाकिस्तानी माध्यमांनुसार, पाकिस्तानी हवाई दलाने काबूलमध्ये हवाई हल्ला केला, ज्यामध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) प्रमुख मुफ्ती नूर वली मेहसूद ठार झाल्याची माहिती देण्यात आली. मेहसूद 2018 पासून टीटीपीचे नेतृत्व करत होता आणि त्याच्यावर अफगाणिस्तानात तालिबानसोबत काम करण्याचा आरोप होता. तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी ट्विटरवर सांगितले की, काबूल शहरात स्फोटांचे आवाज ऐकू आला. मात्र, काळजी करण्याची गरज नाही. तपास सुरू आहे आणि अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती आहे.
हेदेखील वाचा : अफगाणिस्तानात वारंवार भूकंप का होतात? पुन्हा 5.7 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, भारतापर्यंत जाणवले हादरे
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुत्तकी भारत भेटीसाठी नवी दिल्लीत पोहोचले तेव्हाच ही घटना घडली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विटरवर सांगितले की, त्यांना भारत आणि अफगाणिस्तानमधील द्विपक्षीय संबंध आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करण्याची अपेक्षा आहे. तालिबानने नियंत्रण मिळवल्यानंतर 9 ते 16 ऑक्टोबर दरम्यान मुत्तकी यांचा दौरा हा काबुलहून नवी दिल्लीला होणारा पहिला उच्चस्तरीय दौरा आहे.
हेदेखील वाचा : PoK मध्ये सत्तापालटाचे संकेत! पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे युती सरकार कोसळणार?
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मंजूर केलेल्या अफगाणिस्तानातील आंतरराष्ट्रीय प्रवास निर्बंधांमध्ये तात्पुरती शिथिलता आणल्यामुळे ही भेट शक्य झाली. मुत्ताकी यांचा भारत दौरा हा प्रादेशिक राजनैतिकता आणि जागतिक संबंधांमध्ये अफगाणिस्तानच्या सहभागाला बळकटी देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा आहे.