
भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरले तुर्की; रिश्टर स्केलवर 6.1 नोंदवली गेली तीव्रता...
सिंदिरगी : गेल्या काही दिवसांपासून विविध भागांत भूकंप होताना दिसत आहे. त्यातच आता पश्चिम तुर्कीमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ६.१ इतकी तीव्रता नोंदवली गेली. आपत्ती आणि आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेच्या (AFAD) मते, भूकंपाचे केंद्र बालिकेसिर प्रांतातील सिंदिरगी शहरात होते. इस्तंबूल, बुर्सा, मनिसा आणि इझमीर प्रांतांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
स्थानिक वेळेनुसार रात्री १०:४८ वाजता ५.९९ किलोमीटर खोलीवर भूकंप झाला. भूकंपानंतर अनेक धक्के जाणवले. सिंदिरगी शहरात तीन नुकसान झालेल्या इमारती आणि एक दुमजली दुकान कोसळले. असे जरी असले तरी आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती दिली जात आहे. तुर्कीचे गृहमंत्री अली येरलिकाया यांनी याबाबत माहिती दिली. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘कोसळलेल्या इमारती आधीच रिकाम्या होत्या. दोन जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे’.
दरम्यान, तुर्की सक्रिय फॉल्ट लाईन्सवर असल्याने भूकंपाने सर्वाधिक प्रभावित होणाऱ्या देशांमध्ये समाविष्ट आहे. गेल्या ऑगस्टमध्ये, वायव्य प्रांत बालिकेसिरमधील सिंदिरगी येथे ६.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्यामध्ये एक व्यक्ती ठार झाला आणि डझनभर जखमी झाले. तेव्हापासून या प्रदेशात किरकोळ भूकंप जाणवले आहेत.
२०२३ मध्येही ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप
२०२३ मध्येही ७.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्यामुळे मोठी हानी झाली. या भूकंपात ५३००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. या भूकंपात ११ दक्षिण आणि आग्नेय प्रांतांमध्ये लाखो इमारतींचे नुकसान झाले. दरम्यान, शेजारच्या सीरियाच्या उत्तरेकडील भागात ६००० लोकांचा मृत्यू झाला.
गुजरातमध्येही भूकंप
दुसऱ्या एका घटनेत, काही दिवसांपूर्वी गुजरातमधील राजकोट आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपांमुळे लोकांमध्ये घबराट पसरली होती, परंतु सध्या कोणतेही मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र (एनसीएस) नुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.४ इतकी नोंदवली गेली.
हेदेखील वाचा : Earthquake in Rajkot: गुजरातच्या राजकोटमध्ये भूकंपाचे धक्के; रिक्टर स्केलवर ३.४ तीव्रतेची नोंद, लोकांमध्ये घबराट