COVID-19 virus did not spread from Wuhan lab New global research finds important findings
COVID-19 origin study : जगभरात पुन्हा एकदा covid 19 चा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना, या विषाणूच्या उत्पत्तीविषयी दीर्घ काळ वादग्रस्त राहिलेला ‘वुहान लॅब लीक थिअरी’ (Wuhan Lab Leak Theory) पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, या थिअरीला खोडून काढणारे एक महत्त्वाचे वैज्ञानिक संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले असून, त्यानुसार covid 19 विषाणू प्रयोगशाळेतून नव्हे, तर नैसर्गिक रीत्या वटवाघळांमधून उगम पावलेला आहे.
हे संशोधन स्कॉटलंडमधील प्रतिष्ठित एडिनबर्ग विद्यापीठातील वैज्ञानिकांच्या नेतृत्वाखाली झाले असून, त्यात अमेरिका, युरोप आणि आशियातील एकूण २० आंतरराष्ट्रीय संस्थांतील तज्ज्ञ सहभागी होते. त्यांनी १६७ वटवाघळांच्या कोरोनाव्हायरस जीनोमचे सखोल विश्लेषण केले आणि निष्कर्ष काढला की SARS-CoV-2 विषाणूचा उगम उत्तर लाओस व चीनच्या युनान प्रांतातील वटवाघळांमध्ये झाला असावा.
अभ्यासात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, कोविड-१९ विषाणू वुहानच्या प्रयोगशाळेत बनवला गेला, किंवा तिथून तो चुकून बाहेर पसरला, असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत. उलट, उत्पत्तीचे जे अनुवांशिक नमुने मिळाले आहेत ते वुहानपासून सुमारे २,७०० किलोमीटर दूर आढळणाऱ्या वटवाघळांशी जवळचे नाते सांगतात. संशोधन लेखक जोनाथन पेकर यांनी सांगितले की, “SARS-CoV-2 च्या पूर्वजांचा वावर वुहानपासून हजारो किलोमीटर दूर होता. हा विषाणू नैसर्गिकपणे वटवाघळांमध्ये विकसित झाला आणि त्यानंतर तो प्राणी व्यापाराच्या बेकायदेशीर जाळ्यांद्वारे मानवी लोकांमध्ये पोहोचला.”
विषाणूचा मानवी लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधताना शास्त्रज्ञांचे लक्ष वन्यजीवांच्या व्यापाराकडे वळले. संशोधनानुसार, बेकायदेशीर प्राणी व्यापाराच्या साखळीमुळे संक्रमित प्राणी दाट लोकवस्तीच्या भागात पोहोचले, आणि तिथून कोविडचा प्रादुर्भाव झपाट्याने मानवांमध्ये पसरू लागला. अॅरिझोना विद्यापीठाचे जीवशास्त्रज्ञ मायकेल वोरोबे यांनी स्पष्ट केले की, “हा प्रकार आपल्यासाठी नवीन नाही. 2002 मध्ये आलेल्या SARS-CoV-1 विषाणूचा उगमही अशाच पद्धतीने वटवाघळांमधून पाम सिव्हेट व रॅकून डॉग या प्राण्यांमध्ये झाला होता.” ते म्हणाले, “SARS-CoV-2 मध्येही हाच इतिहास पुन्हा दिसतो आहे. हे नैसर्गिक स्थलांतर नसून, मानवी हस्तक्षेपातून घडलेला प्रसार आहे.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIDEO VIRAL : ‘दारू पिऊन टेबलावर नाचण्यास भाग पाडले…’ ऑस्ट्रेलियाच्या हिजाब परिधान केलेल्या महिला खासदाराचा गंभीर आरोप
ही नवी वैज्ञानिक माहिती अशा काळात समोर आली आहे, जेव्हा भारत, पाकिस्तान, चीन, थायलंड आणि सिंगापूरसह अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा कोविड रुग्णांमध्ये वाढ होत आहे. दिल्लीसह भारतातील अनेक शहरांमध्ये नवीन प्रकरणांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर, कोविडच्या उत्पत्तीविषयी खोट्या माहितीचा प्रसार रोखणे आणि वैज्ञानिक तथ्यांवर आधारित निर्णय घेणे अत्यावश्यक झाले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : चीन कधीपर्यंत बनवणार ‘1000’ Nuclear weapons? अमेरिकन गुप्तचर अहवालात सत्य आले समोर
या जागतिक स्तरावरील विस्तृत संशोधनानुसार, कोविड-१९ विषाणू हा वुहानच्या प्रयोगशाळेतून नव्हे, तर नैसर्गिक रीत्या वटवाघळांमधून उगम पावलेला असून, मानवी हस्तक्षेपातून तो लोकांमध्ये पसरला. या निष्कर्षांमुळे ‘लॅब लीक’ सिद्धांतावर शिक्कामोर्तब न होता, नैसर्गिक उत्पत्तीचा सिद्धांत अधिक दृढ होतो आहे. त्यामुळे, भविष्यातील महामारींना रोखण्यासाठी वन्यजीव व्यापाराचे नियंत्रण, जैवसुरक्षा आणि जनजागृती यावर अधिक लक्ष देणे आवश्यक ठरणार आहे.