अमेरिका-चीनमध्ये पुन्हा सुरु झाले व्यापार युद्ध; ट्रम्प यांनी चीनवर लावला 100 टक्के टॅरिफ
वॉशिंग्टन : अमेरिका आणि भारतामध्ये टॅरिफवरुन (Tariff) तणावाचे वातावरण कायम आहे. यामुळे दोन्ही देशांवर परिणाम होत आहे. पण डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) भारतावरील टॅरिफ कमी करण्यास तयार नाहीत. त्यांच्या या निर्णयामुळे अमेरिकेतील कॉंग्रेस खासदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. असे असताना आता अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध पुन्हा सुरु झाले आहे.
अमेरिकन उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या दुर्मिळ खनिजांच्या निर्यातीवर चीनने बंदी घातली आहे. त्यामुळे आता दोन्ही देशांमधील तणाव वाढताना दिसत आहे. ट्रम्प यांनी याला चीन-आक्रमक भूमिका म्हणत आता चिनी उत्पादनांवर अतिरिक्त टॅरिफ जाहीर केला आहे. 1 नोव्हेंबर 2025 पासून अमेरिका चीनमधून आयात केलेल्या सर्व उत्पादनांवर अतिरिक्त 100 टक्के टॅरिफ लादेल. हा टॅरिफ आधीच लागू असलेल्या टॅरिफच्या वर असेल. शिवाय, अमेरिका त्याच दिवशी सर्व महत्त्वाच्या सॉफ्टवेअरवर निर्यात नियंत्रणे देखील लादेल.
हेदेखील वाचा : ‘भारताशी संबंध तात्काळ सुधारा, नाहीतर…’ ; अमेरिकन कॉंग्रेस खासदारांचा डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा
ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये नवीन टॅरिफची घोषणा केली. त्यात त्यांनी लिहिले की, ‘१ नोव्हेंबर २०२५ पासून (किंवा त्यापूर्वी, चीनच्या कोणत्याही नवीन कृतींवर अवलंबून), अमेरिका चीनमधून आयात होणाऱ्या सर्व आयातीवर १०० टक्के टॅरिफ लादेल. सध्या भरल्या जाणाऱ्या कोणत्याही टॅरिफच्या वर हा दर असणार आहे.
अमेरिकन हितासाठी कारवाई
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या मते, चीनच्या कृतींमुळे अमेरिकेला कठोर पावले उचलावी लागली आहेत, सर्व महत्त्वाच्या सॉफ्टवेअरवर अतिरिक्त शुल्क जाहीर करावे लागले आहे. ट्रम्प यांनी ही कारवाई केवळ अमेरिकेच्या हितासाठी आहे आणि इतर देशांबाबतचे निर्णय स्वतंत्रपणे घेतले जातील, असे म्हटले जात आहे.
प्रत्येक उत्पादनावर ज्यादा शुल्क
तज्ज्ञांच्या मते, सध्या चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या जवळजवळ प्रत्येक उत्पादनावर आधीच ज्यादा शुल्क लागू आहे. सरासरी प्रभावी शुल्क दर सध्या सुमारे 40 टक्के आहे, ज्यामध्ये स्टील आणि अॅल्युमिनियमवर ५० टक्के आणि ग्राहकोपयोगी वस्तूंवर ७.५ टक्क्यांपर्यंतचा समावेश आहे.
ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांना भेटण्यास दिला नकार
यापूर्वी, डोनाल्ड ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाच्या त्यांच्या आगामी भेटीदरम्यान चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटण्यास नकार दिला होता. त्यांना आता अशा बैठकीचे कोणतेही कारण दिसत नाही. जर चीनने दुर्मिळ पृथ्वीवरील निर्बंध सुरू ठेवले तर आणखी कठोर उपाययोजना केल्या जाऊ शकतात. ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये याबाबत भाष्य केले आहे.