Trump questions global support for the U.S. in a China-Taiwan war India’s role seen as crucial
China Taiwan conflict : चीनकडून तैवानवर संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन प्रशासनाने या संभाव्य संघर्षावर जागतिक पातळीवरील मैत्रीपूर्ण देशांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यामध्ये विशेषतः जपान आणि ऑस्ट्रेलिया यांना त्यांच्या भूमिका स्पष्ट करण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे आशियात नवीन धोक्यांची चिन्हे उमटत आहेत आणि भारताची रणनीती यामध्ये महत्त्वाची ठरणार आहे.
फायनान्शियल टाईम्सच्या अहवालानुसार, अमेरिकेचे संरक्षण धोरण उपसचिव एल्ब्रिज कोल्बी यांनी अलीकडेच जपान व ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत एक निर्णायक प्रश्न उपस्थित केला “जर चीनने तैवानवर हल्ला केला, तर तुम्ही अमेरिकेच्या बाजूने उभं राहाल का?”
हा सवाल ट्रम्प प्रशासनाच्या ‘America First’ धोरणाच्या पावलावर पाऊल टाकणारा आहे. अमेरिका आपल्या मित्र राष्ट्रांकडून केवळ समर्थन नाही, तर सामूहिक संरक्षणासाठी आर्थिक आणि सामरिक योगदानाचीही अपेक्षा करत आहे. पण यावरून प्रश्न उभा राहतो की, या संघर्षात कोण कोणाच्या बाजूने उभे राहतील?
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : मानवी इतिहासातील सर्वात मोठा साप कोणता? भारतातील ‘वासुकी’ की कोलंबियाचा ‘टायटानोबोआ’
अहवालानुसार, ट्रम्प प्रशासनाने विचारलेला हा थेट सवाल जपान आणि ऑस्ट्रेलियासाठी अस्वस्थ करणारा ठरला आहे. याचे कारण म्हणजे – चीनच्या हल्ल्यात तैवानच्या संरक्षणाची स्पष्ट हमी अमेरिकेने अद्याप दिलेली नाही. दुसरीकडे, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे भौगोलिक दृष्ट्या चीनच्या अगदी जवळ आहेत, आणि त्यांना चीनच्या क्षेपणास्त्रांचा धोका अधिक आहे.
त्यामुळे तैवानसाठी थेट लष्करी सहभाग घेणे हे या देशांसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. वरकरणी अमेरिका तैवानला शस्त्रास्त्रे पुरवते आणि त्याच्या सुरक्षेसाठी जबाबदारी घेते, पण लष्करी हस्तक्षेपाबाबतची अमेरिका धोरणाची स्पष्टता अजूनही धूसर आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक भागीदारी बळकट होत आहे, परंतु भारत अजूनही कोणत्याही औपचारिक लष्करी आघाडीचा भाग नाही. ट्रम्प प्रशासनाने अद्याप भारताला या संदर्भात थेट विचारणा केलेली नाही. परंतु जर अमेरिका-चीन युद्ध झालेच, तर भारताकडून चीनविरोधी भूमिका घेण्याची अपेक्षा निश्चित केली जाईल.
तथापि, राजकीय निरीक्षकांच्या मते, भारत अशी कोणतीही भूमिका घेण्यास टाळाटाळ करेल. भारताची तैवानबाबतची भूमिका संयमी आहे आणि तो चीनशी थेट संघर्षात उतरू इच्छित नाही. भारतापुढे एक आव्हान असेल – अमेरिका आणि चीन यांच्यातील तणावात सामंजस्य राखण्याचे.
भारतातील तज्ञांचे म्हणणे आहे की, अलिकडच्या भारत-पाकिस्तान तणावात ट्रम्प प्रशासनाच्या अस्पष्ट भूमिकेमुळे भारताला अमेरिकेच्या खऱ्या प्राधान्यक्रमांची जाणीव झाली आहे. त्यामुळे भविष्यात चीन-तैवान युद्ध झाल्यास भारत तटस्थ भूमिका घेण्याची शक्यता अधिक आहे. भारताची धोरणात्मक बांधिलकी जरी अमेरिकेकडे झुकते, तरीही चीनशी थेट युद्ध करणे म्हणजे अनेक आर्थिक, सामरिक आणि राजनैतिक परिणामांना आमंत्रण देणे ठरेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : बांगलादेशमध्ये निवडणुकीपूर्वीच राजकारणात रंगत! मोहमद युनूस यांच्या जाण्याच्या चर्चांना वेग, ‘या’ पक्षांनी दिले संकेत
तैवानवरील संभाव्य चिनी हल्ला हे फक्त आशियाई राजकारणासाठी नाही, तर संपूर्ण जगाच्या सामरिक संतुलनासाठी एक मोठे आव्हान आहे. ट्रम्प प्रशासनाने मैत्रीपूर्ण देशांना थेट विचारल्याने आता सर्वांचे लक्ष आहे कोण कोणाच्या बाजूने उभे राहतात? भारत यामध्ये शांततामूलक आणि धोरणनिष्ठ भूमिका घेत जाईल, हे निश्चित असले तरी भविष्यात त्याच्या भूमिकेकडे संपूर्ण जग बघत राहणार आहे.