कीव : रशियाने युक्रेनला पाठवलेल्या हरियाणातील 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मॉस्कोमधील भारतीय दूतावासाने रवी मौन (22) यांच्या मृत्यूची सत्यता पडताळली आहे. पण रवीच्या कुटुंबियांनी रवीला फसवून त्याला लढण्यासाठी रशियाला पाठवल्याचा दावा केला आहे. 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनमध्ये मरण पावणारा हा पाचवा भारतीय आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या मॉस्को भेटीदरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नवी दिल्लीला युक्रेनमध्ये रशियन सैन्यासाठी काम करणाऱ्या सर्व भारतीयांची सुटका केली जाईल आणि त्यांच्या परतीची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र रवीच्या मृत्यूनंतर रशियन लष्कर अजूनही युक्रेनमध्ये भारतीयांना तैनात करत असल्याने पुन्हा एकदा समोर आले आहे.
रवीचा भाऊ अजय मून याने दावा केला आहे की, रवी यावर्षी 13 मे रोजी रशियाला गेला होता. एका एजंटने त्याला वाहतुकीच्या कामासाठी रशियाला पाठवले होते. परंतु तेथे पोहोचल्यानंतर त्याला सैन्यात भरती करण्यात आले. अजय यांनी 21 जुलै रोजी भावाची विचारपूस करण्यासाठी पत्र लिहिले. पण रवीचा मृत्यू झाल्याची माहिती तेथील दूतावासाकडून मिळाली. त्यानंतर भारतीय दूतावासाने मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी कुटुंबीयांकडून डीएनए चाचणी अहवाल मागवला आहे. धक्कादायक म्हणजे, रशियन सैन्याने आपल्या भावाला युक्रेनच्या सैन्याविरुद्ध लढण्यासाठी आघाडीवर जा, अन्यथा 10 वर्षे तुरुंगवास भोगण्यास तयार राहा, अशी धमकी आपल्या भावाला देण्यात आल्याचा दावाही केला आहे.
रशियन सैन्यात भरती झाल्यावर रवीला खंदक खोदण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आणि नंतर त्याला आघाडीवर पाठवण्यात आले. रवी 12 जुलैपर्यंत कुटुंबाच्या संपर्कात होता. भारतीय दूतावासाने रवीच्या भावाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ‘रशियाने रवीच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. मात्र, मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी त्यांना डीएनए चाचणी घ्यावी लागेल. कुटुंबीयांनी पंतप्रधान मोदींकडे रवीचा मृतदेह भारतात परत आणण्याचे आवाहन केले आहे. मृतदेह आणण्यासाठी आपल्याकडे पैसे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. रवीला रशियाला पाठवण्यासाठी एक एकर जमीन विकून कुटुंबाने 11.50 लाख रुपये खर्च केले होते. पण आता त्याचा मृतदेह आणण्यासाठी आपल्याकडे पैसे नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी म्हटले आहे.
दरम्यान, रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून डझनभर भारतीय नागरिकांना रशियन सैन्यात युद्धविरहित नोकऱ्या किंवा नागरी क्षेत्रात नोकरी देण्याचे आमिष दाखवून युक्रेनमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती आहे. त्याचबरोबर व्हिसा नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली रशियामध्ये अनेकांना अटक करण्यात आली आहे आणि त्यांना एक वर्ष सैन्यात सेवा करावी लागेल किंवा दहा वर्षे तुरुंगात घालवावे लागतील, असे सांगण्यात आले आहे.