US billionaires plan luxury bunkers over nuclear war fears
luxury doomsday bunkers : आजच्या अस्थिर जगात सामान्य माणूस महागाई, नोकरी, घरभाडं, आरोग्य अशा दैनंदिन समस्यांशी झुंजतोय. पण जगातील अब्जाधीश वेगळ्याच चिंतेत आहेत. त्यांना भीती आहे ती येऊ घातलेल्या अणुयुद्धाची, हवामान बदलाची आणि मानवी विनाशाच्या शक्यतेची. त्यामुळे हे धनाढ्य उद्योगपती गुप्त बंकर, आलिशान राजवाडे आणि प्रचंड इस्टेट्स बांधून स्वतःसाठी “अपोकॅलिप्स रिसॉर्ट” तयार करत आहेत.
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांचे रिअल इस्टेट साम्राज्य खूप चर्चेत आहे. गेल्या काही वर्षांत त्यांनी केवळ कॅलिफोर्नियातील पालो अल्टो येथेच ११ घरे विकत घेऊन एक खाजगी कंपाऊंड तयार केला. हिरव्यागार बागा, स्विमिंग पूल, गेस्ट हाऊस, पिकलबॉल कोर्ट, पत्नी प्रिसिला चॅनचा पुतळा आलिशान जीवनशैलीची सर्व चिन्हे इथे आहेत. पण सर्वात मोठा खुलासा म्हणजे त्यांनी भूमिगत तळघराच्या नावाखाली एक प्रचंड बंकर उभारल्याची चर्चा शेजाऱ्यांत आहे.
त्यांचा सर्वात मोठा प्रकल्प मात्र हवाईतील कौई बेटावर आहे. येथे त्यांच्याकडे न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कपेक्षा तिप्पट मोठी २.३ चौरस किलोमीटरची इस्टेट आहे. या बेटावर त्यांनी दोन आलिशान हवेली, ट्रीहाऊस आणि एक प्रचंड भूमिगत निवारा बांधला आहे. खर्च? तब्बल ३०० दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त.
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांची दृष्टी मात्र आणखी वेगळी आहे. त्यांनी टेक्सासमध्ये तब्बल ४ चौरस किलोमीटरची इस्टेट बांधली आहे. येथे त्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या मातांसाठी वेगवेगळी आलिशान घरे आहेत. पण मस्क फारसा बंकरवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांचं म्हणणं असं “जगावर आपत्ती आलीच तर मी माझ्या कुटुंबाला मंगळावर घेऊन जाईन.”
म्हणजेच पृथ्वीवर विनाश घडला तरी मस्कच्या मनात ‘प्लॅन बी’ तयार आहे – अवकाश प्रवासाचा!
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israeli airstrike Gaza : गाझामध्ये पुन्हा नरसंहार; इस्रायलच्या हल्ल्यात तीन पत्रकारांसह 15 ठार
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील मोठं नाव सॅम ऑल्टमन यांनीही स्वतःसाठी गुप्त भूमिगत बंकर तयार केला आहे. एका पॉडकास्टमध्ये त्यांनी स्पष्ट केलं की जगात सुरू असलेले युद्ध, संघर्ष आणि अण्वस्त्रांची भीती यामुळे त्यांनी अशी तयारी केली आहे. “हे एआयमुळे नाही, तर लोक पुन्हा बॉम्ब टाकू लागले म्हणून,” असं ते म्हणाले. ऑल्टमन यांच्याकडे अजून एक बंकर बांधण्याचाही विचार सुरू आहे.
अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्याकडे जगभरात असंख्य प्रॉपर्टीज आहेत. फ्लोरिडासारख्या हवामान-जोखमीच्या भागातही त्यांच्याकडे प्रचंड इस्टेट्स आहेत. प्रलयाच्या काळात स्वतःचं आणि कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी त्यांनी गुप्त बंकर आणि महाल तयार ठेवले आहेत.
हे बंकर साधे नाहीत. सौरऊर्जेवर चालणारे, प्रगत हवा व पाणी गाळण्याच्या प्रणालींनी सज्ज, मातीशिवाय पिके उगवण्यासाठी हायड्रोपोनिक फार्म्स, वैद्यकीय सुविधा, फिटनेस सेंटर, स्विमिंग पूल, खासगी थिएटर सर्व काही आलिशान. साधारण माणसासाठी कल्पनाही अशक्य असलेले हे बंकर अब्जाधीशांसाठी ‘प्रलयातील स्वर्ग’ ठरणार आहेत. मात्र टीकाकारांचे मत वेगळे आहे. “जेव्हा जग विनाशाच्या उंबरठ्यावर उभं असेल, तेव्हा हे उद्योगपती त्यांच्या गुप्त महालातून मृत्यूचा तमाशा पाहतील. मानवतेच्या शेवटच्या क्षणीही त्यांना स्वतःच्या वैभवाचीच चिंता असेल,” असं त्यांचं म्हणणं आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indian Aroma London : आत नेमकं काय घडलं? लंडनमधील एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये आग लावून… ‘हा’ VIDEO जरूर पाहा
सामान्य माणूस विचारतो “जर जगच नष्ट झालं तर आपली किंमत काय राहणार?” पण अब्जाधीशांची तत्त्वज्ञानं वेगळी आहेत. त्यांच्यासाठी ‘जग’ म्हणजे स्वतःची सुरक्षितता, स्वतःचा महाल आणि स्वतःचा शाश्वत वारसा. शेवटी प्रश्न उरतो पैसा माणसाला सर्वकाही देऊ शकतो, पण खऱ्या आपत्तीसमोर तो खरंच जीवन वाचवू शकतो का? आणि जर तो फक्त काही मोजक्या लोकांसाठी जगण्याची संधी ठेवतो, तर त्याला प्रगती म्हणायचं की स्वार्थ?