शपथविधीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प पुन्हा चर्चेत; 'या' छोट्या देशावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न
पनामा: डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष, सध्या त्यांच्या शपथविधीपूर्वी कोणत्या ना कोणत्या विधानामुळे चर्चेचा विषय बनत आहेत. त्यांनी जगभरातील मित्र देश आणि शेजारील देशांना चांगलेच हादरवून टाकले आहेत. आता त्यांच्या पनामा नहरवरील वक्तव्याने आंतरराष्ट्रीय वादाला तोंड फोडले आहे. ट्रम्प यांनी पनामा नहरवर अमेरिकेने पुन्हा नियंत्रण मिळवावे, असे विधान एरिझोनामध्ये आयोजित एका रॅलीदरम्यान केले.
ट्रम्प यांचे वक्तव्य देशाच्या सार्वभौमत्वाचा अपमान करणारे
डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका ही नहर पनामा देशाला सोपवून मोठी चूक केली आहे. ट्रम्प यांनी पनामा नहरवर “अनुचित” शुल्क आकारले जात असल्याचे सांगून त्यावर पुन्हा ताबा मिळवण्याचा इशारा दिला. पनामाचे राष्ट्राध्यक्ष जोस राऊल मुलिनो यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला असून त्यांनी याला आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचा अपमान असल्याचे म्हटले आहे. तसेच कोलंबियाचे अध्यक्ष यांनीही पनामाच्या अध्यक्षांना समर्थन दर्शवले आहे.
अटलांटिक व प्रशांत महासागराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग
पनामा नहर हा अटलांटिक व प्रशांत महासागरांना जोडणारा महत्त्वाचा जलमार्ग आहे. 1900 च्या दशकाच्या सुरुवातीला अमेरिकेने याचे बांधकाम केले आणि 1977 मध्ये जिमी कार्टर यांनी संधीचे करार करून 1999 मध्ये नहरचा ताबा पनामा देशाला दिला. मात्र, ट्रम्प यांच्या विधानामुळे पनामा नहरच्या स्वायत्ततेवर पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे.
पनामा नहरचे महत्त्व प्रचंड असून, जगातील व्यापारी आणि लष्करी जहाजांसाठी हा जलमार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु, 2023 मध्ये आलेल्या दुष्काळामुळे या नहरच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला. पनामा सरकारने पारगमन शुल्कात वाढ केली असून, पुढील वर्षांतही ती कायम राहण्याची शक्यता आहे.
पनामाच्या राष्ट्राध्यक्षांची तीव्र प्रतिक्रीया
ट्रम्प यांच्या विधानानंतर पनामा राष्ट्राध्यक्ष जोस राउल मुलिनो यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी ट्रम्प यांचे विधान देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला असल्याचे म्हटले आहे. त्यांनी “पनामा नहर हा पनामा देशाचा अविभाज्य भाग आहे आणि तो तसाच राहील,” असे ठामपणे सांगितले. त्यांनी नहरवर आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबत स्पष्टीकरण देत सांगितले की, हे शुल्क सुधारणा व व्यवस्थापनासाठी वापरले जाते.
कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनीही पनामा देशाच्या बाजूने भूमिका घेतली आहे. “आम्ही व्यापार आणि सहकार्यासाठी नेहमीच तयार आहोत, पण आमच्या सन्मान आणि स्वाभिमानावर कोणताही तडजोड होणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक मोहिमेच्या वेळी पनामा नहरचा मुद्दा उचलून धरत अमेरिकेच्या “स्वर्णिम युगाचा” दावा केला आहे. त्यांनी सर्व नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करत डेमोक्रॅटिक नेत्यांनाही यामध्ये सहभागी होण्याचे सुचवले. मात्र, पनामा आणि त्याच्या शेजारी देशांनी त्यांच्या सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावर ठाम भूमिका घेतली आहे, ज्यामुळे हा वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.