नवी दिल्ली : भारताने रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र (Missile S-400) खरेदी केल्यास आता अमेरिकेला (USA) काहीही हरकत राहणार नाही. अमेरिकेच्या लोकप्रतिनिधी सभागृहात (House Of Representative) याबाबतच्या विधेयकाला पारित करण्यात आले आहे. म्हणजेच काटसा निर्बंधातून (CAATSA Act) भारताला वगळण्यावर अमेरिकन संसदेची सहमती झाली आहे.
लोकप्रतिनिधी सभागृहात हे दुरुस्ती विधेयक मंजूर झाले आहे. राष्ट्रीय सुरक्षा प्राधिकरण कायद्यावरील (NDAA) चर्चेदरम्यान भारतवंशीय खासदार रो खन्ना (Ro Khanna) यांनी हे दुरुस्ती विधेयक पटलावर मांडले होते. चीनसारखी आक्रमक भूमिका घेणाऱ्या देशाला रोखण्यासाठी या सौद्याला परवानगी देण्यात यावी, अशी भूमिका मांडली होती.
भारताने रशियाशी एस-४०० क्षेपणास्त्र खरेदीचा सौदा केल्यानंतर अमेरिका काटसाअंतर्गत भारतावर निर्बंध लादण्याची चर्चा सुरू होती. भारत-अमेरिका यांच्यातही हा महत्त्वाचा मुद्दा बनला होता. युक्रेन युद्धामुळे (Russia- Ukraine War) रशियाकडून शस्त्रे, तेल व इतर उत्पादने खरेदी करणाऱ्या देशांवर निर्बंध लादले जातील, अशी घोषणा अमेरिकेने केली होती.