

ट्रम्प प्रशासनाची तेल बाजारावरील नजर
व्हेनेझुएलावर आर्थिक दबाव
इराकमध्येही चर्चेला वेग
World News : जागतिक तेल बाजारपेठेत नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात अमेरिकेने मोठी राजकीय खेळी केल्याचा दावा समोर आला आहे . अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने व्हेनेझुएला आणि इराक या दोन प्रमुख तेल उत्पादक देशांवर OPEC संघटनेतून बाहेर पडण्याचा विचार करण्यासाठी दबाव टाकल्याची माहिती समोर आली आहे .
हे सगळे जुळवून आणण्यासाठी अमेरिकन अधिकाऱ्यांनी दोन्ही देशांशी चर्चा केली होती . या दोन्ही देशांना संघटनेतून बाहेर काढण्यात यश आल्यास जागतिक तेल बाजारपेठेतील OPEC चे वर्चस्व कमी होईल .मात्र अमेरिकेने उच्चस्तरीय चर्चेत OPEC मधून बाहेर पडण्याचा मुद्दा उपस्थित केल्याचे नाकारले आहे .
अमेरिकेचा हा प्रयत्न केवळ राजनैतिक दबावापुरता मर्यदित नसून त्यामागे आर्थिक आणि ऊर्जा क्षेत्रातील हितसंबंध असल्याचे मानले जात आहे . OPEC संघटना सदस्य देशांसाठी तेल उत्पादनाच्या मर्यादा निश्चित करते . त्यामुळे सदस्य देशांना त्यांच्या इच्छेनुसार उत्पादन वाढवता येत नाही . अमेरिकेला मात्र व्हेनेझुएला आणि इराकमध्ये तेल उत्पादन आणि गुंतवणूक वाढवायची आहे .
अमेरिकन तेल कंपन्यांना या देशांमध्ये अधिक संधी मिळाव्यात , अशीही प्रशासनाची भूमिका असल्याचे बातमीतून समोर आले आहे . OPEC च्या उत्पादन मर्यादांमुळे अमेरिकेच्या या योजनांना अडथळा निर्माण होऊ शकतो . अशी चिंता व्यक्त करण्यात आली होती .
व्हेनेझुएलाचे तत्कालीन अध्यक्ष निकोलस मादुरो यांना जानेवारीत सत्तेवरून हटवल्यानंतर अमेरिकेच्या तेथील सरकारी निधीवरील प्रभाव वाढला . याच काळात व्हॅनेझुएलाने OPEC मधून बाहेर पडण्याबाबत अमेरिकन अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याचे समजते आहे . इतकेच न्हवे तर व्हॅनेझुएलाला OPEC चे वार्षिक सदस्यत्व शुल्क भरण्यापासूनही रोखण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे .
हे शुल्क सुमारे २८ लाख युरो आहे . अमेरिकेच्या दबावाची माहिती समोर आल्यानंतर सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी हस्तक्षेप केला . त्यांनी ट्रम्प प्रशासनाला व्हेनेझुएलाच्या OPEC \मधून बाहेर पडण्याचा मुद्दा पुढे न रेटण्यास प्रवृत्त केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे .
इराकचे पंतप्रधान अली फालेह अल- झैदी यांनी अमेरिकन अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर OPEC मधून बाहेर पडण्याची शक्यता सरकारच्या बैठकीत मांडल्याचे समजते आहे . पण इराकच्या तेल मंत्रालयाने या प्रस्तावाला विरोध केला . संघटनेमधून बाहेर पडण्याऐवजी तेल उत्पादनाचा अधिक कोटा मिळवण्याच्या प्रयत्न करावा अशी भूमिका मंत्रालयाने मांडली .
दरम्यान २०१९ पासून अंगोला , इक्वाडोर , कतार आणि संयुक्त अरब अमिरातीसारख्या देशांनी OPEC मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे . त्यामुळे संघटनेच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे . व्हेनेझुएला आणि इराकसारख्या संस्थापक सदस्यांनीही बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास जागतिक तेल बाजारपेठेतील OPEC चा प्रभाव आणखी कमी होण्याची शक्यता आहे .