US President Donald Trump's sensational statement on Greenland says This rejection is not a friendly act
वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच अनेक खळबळजनक निर्णय घेतले असून सध्या ते कोणत्या ना कोणत्या विधानावरुन चर्चेचा विषय बनत आहेत. सध्या त्यांच्या ग्रीनलँड खरेदी करण्याचा विषय अनेकदा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. ट्रम्प यांनी ग्रीनलँड विकत घेण्याच्या इच्छेबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर वाद निर्माण झाला आहे. मात्र, ग्रीनलॅंडचे अध्यक्ष म्यूट एगेडे यांनी स्पष्टपणे डोनाल्ड ट्रम्प यांच्या या प्रस्तावाला फेटाळून लावले आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा डेन्मार्क आणि ग्रीनलॅंडवर मोठे वक्तव्य केले असून यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला
ग्रीनलँड हे डेन्मार्कच्या नेतृत्त्वाखालील एक स्वायत्त प्रदेश आहे, मात्र ट्रम्प यांनी यावर नियंत्रण मिळवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत ग्रीनलॅंडच्या खरेदीचा मुद्दा मांडला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, ग्रीनलँड हा प्रदेश अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, ग्रीनलँडच्या जवळच्या समुद्रात रशिया आणि चीन यांसारख्या महत्त्वाच्या देशांची जहाजे आहेत, यामुळे जागतिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. ट्रम्प यांच्या मते, अमेरिकेने ग्रीनलँडवर नियंत्रण मिळवले, तर हा धोका कमी होईल.
काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
याचबरोबर ट्रम्प यांनी असेही म्हटले की, ग्रीनलँडच्या ५५,००० लोकांना अमेरिकेसोबत राहणे आवडेल, कारण डेन्मार्कने त्यांच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केले आहे. तथापि, डेन्मार्कने ट्रम्प यांच्या या प्रस्तावाला स्पष्टपणे नकार दिला आहे. डॅनिश पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसेन यांनी ठामपणे सांगितले की, ग्रीनलँड विक्रीसाठी नाही आणि अशा प्रस्तावावर विचार करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ट्रम्प यांनी हा नकार “मैत्रीपूर्ण कृत्य” नसल्याचे म्हटले आणि त्यावर वेगळ्या प्रकारे विचार करण्याचा इशाराही दिला. त्यांनी ग्रीनलॅंडला अमेरिकेचा भाग बनवण्याची गरज असल्याच्या मुद्द्यावर भर दिला आहे.
ट्रम्प यांचा खरा हेतू
ट्रम्प यांचा खरा हेतू राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असला तरी त्यांच्या वक्तव्यांवरून उघडपणे स्पष्ट होते की, ग्रीनलँडमधील नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण मिळवणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. ग्रीनलँड हा प्रदेश खनिज संपत्तीने समृद्ध आहे. त्याशिवाय, ते भू-राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे ठिकाण आहे. यामागचे आणखी एक मुख्य कारण म्हणजे, आर्क्टिक प्रदेशावर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रीनलँड महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
सध्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यांमुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिका आणि डेन्मार्कमधील संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. ग्रीनलँडमधील स्थानिक लोकसंख्याही ट्रम्प यांच्यावर नाराज झाली असून, त्यांना वाटते की त्यांचे भविष्य त्यांच्या संमतीशिवाय ठरवले जात आहे. या सर्व गोष्टींवरुन स्पष्ट होते की, ग्रीनलँड हा विषय केवळ भूभागाच्या विक्रीचा नसून राष्ट्रीय स्वार्थ, आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि नैसर्गिक संसाधनांवर ताबा मिळवण्याचा आहे.