Bangladesh Politics: बांगलादेशात शेख हसीना आणि अवामी लीगवर संकट; निवडणुक लढवण्याची परवानगी नाही?(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ढाका: गेल्या काही काळापासून बांगलादेशच्या राजकारणात उलथापालथ सुरु आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या हिंसक विद्यार्थी आंदोलनानंतर शेख हसीना यांना देश सोडून जावे लागले. त्यानंतर त्यांनी भारतात आश्रय घेतला. सध्या बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार स्थापन झाले आहे, मात्र, शेख हसीना यांच्या देश सोडून गेल्यानंतर त्यांच्यांवर आणि पक्ष आवामी लीगच्या नेत्यांवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये खून, अपहरण, हिंसा आणि दंगलींचा समावेश आहे. मात्र, सध्या धक्कादायक संकेत मिळत आहेत की बांगलादेश सरकार आवामी लीगवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे आणि पक्षाला निवडणूक लढवण्यास परवानगी दिली जाणार नाही.
बांगलादेश समर्थक गटच निवडणुकीत सहभागी होतील
मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकरचे वरिष्ठ सल्लागार महफूज आलम यांनी याबाबत एक मोठे विधान केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, बांगलादेशमध्ये निवडणुका फक्त बांगलादेश समर्थक गटांमध्येच होतील. एका रॅलीदरम्यान त्यांनी स्पष्ट केले की, माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा पक्ष बीएनपी, जमात-ए-इस्लाम आणि अन्य बांगलादेश समर्थक गट देशात आपली राजकीय प्रक्रिया सुरू ठेवतील. मात्र, शेख हसीना यांच्या आवामी लीगच्या राजकीय पुनर्वसनाला परवानगी देण्यात येणार नाही. आलम यांनी असेही स्पष्ट केले की, शेख हसीना सरकारने जी संस्थात्मक हानी केली आहे, ती सुधारित केल्याशिवाय कोणत्याही निवडणुका होणार नाहीत.
आलम हे मोहम्मद युनूस यांच्या सरकारमधील एक वरिष्ठ आणि महत्त्वाचे मंत्री असून, त्यांनी बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनामागील प्रमुख व्यक्ती म्हणून भूमिका बजावली आहे. युनूस यांनी संयुक्त राष्ट्र महासभेतील एका कार्यक्रमात आलम यांची प्रशंसा केली होती. तसेच आलम यांना आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुख व्यक्तींपैकी त्यांना महत्त्वाचे स्थान देण्यात येते.
BNP चे आवामी लीग ला समर्थन
जवळजवळ 5 ऑगस्ट 2024 पासून आवामी लीग राजकीय क्षेत्रातून गायब आहे. आवामी लीगच्या पक्षातील बहुतांश नेते आणि शेख हसीना यांचे कॅबिनेट सदस्य खुनासारख्या गुन्ह्यांमध्ये तुरुंगात असून काही नेते देश-विदेशात फरार झाले असल्याचे म्हटले जात आहे. तरीही, बीएनपीने(BNP) कोणत्याही राजकीय पक्षावर बंदी घालण्याच्या धोरणाला विरोध दर्शवला आहे आणि आवामी लीगच्या अस्तित्वाला समर्थन दिले आहे.
निवडणुका आणि सुधारणा
बांगलादेशात पुढील निवडणुका कधी होणार? तसेच आवामी लीग निवडणुक लढवणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मोहम्मह युनूस यांना याबाबत विचारले असता त्यांनी, बांगलादेशमध्ये पुढील निवडणुका 2025 च्या अखेरीस किंवा 2026 च्या सुरुवातीस होऊ शकतात असे म्हटले आहे. मात्र, निवडणुकीची वेळ सुधारणा आणि राजकीय सहमतीवर अवलंबून असणार. त्यामुळे बांगलादेशच्या राजकारणात पुढील काही महिने निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.