अयोध्येमध्ये राम मंदिर उद्घाटन सोहळा (Ayodhya Ram Temple inauguration) येत्या 22 तारखेला पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरामध्ये जय्यत तयारी केली जात आहे. फक्त भारतातच नाही तर परदेशामध्ये जिथे हिंदू बांधव आहेत त्या देशामध्ये या दिवशी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभू रामांच्या जन्मस्थळी (Prabhu Ram Birthplace) हे मंदिर बांधण्यात येत असले तरी भारताबाहेर देखील रामांचे भव्य मंदिर (Ram Mandir) उभारण्यात येणार आहे. जगातील सर्वात उंच मंदिर हे भारताबाहेर उभारले जाणार आहे.
जगातील सर्वांत उंच राम मंदिर हे ऑस्ट्रेलियामध्ये उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय श्री राम वैदिक आणि सांस्कृतिक संघटना (International ShriRam Vedic And Cultural Union Inc.) यांच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियामधील पर्थ शहरामध्ये हे भव्य श्री राम मंदिर बांधणार आहे. हे मंदिर तब्बल 721 फूट उंच असणार असून जगातील हे सर्वांत उंच राम मंदिर (World’s tallest Ram temple)असणार आहे. या वास्तूचा प्राथमिक आराखडा देखील ISVACU च्या वेबसाईटवर दाखवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 150 एकर जागेवर हे बांधण्यात येणाऱ्या या मंदिराच्या परिसरामध्ये हनुमान वाटिका, सीता वाटिका, जटायू बाग, शबरी वन, जामवंत सदन देखील बांधण्यात येणार आहे. हनुमान वाटिकेमध्ये 108 फूट उंच बजरंगबलीची मूर्ती देखील असणार आहे. या वास्तूमध्ये राम मंदिरासोबतच योग, साधना, ध्यान केंद्र, सांस्कृतिक केंद्र अतिथी गृह, वेदपाठ सेंटर, बहुकार्यात्मक कम्युनिटी हॉल, सामुदायिक स्वयंपाकघर, आर्ट गॅलरी आणि प्राचीन पुस्तके, लिपी, रामायण आणि इतर प्रकाशनांची लायब्ररी देखील उभारण्यात येणार आहे. यामध्ये समाजकल्याणकारी उपक्रम राबवले जातील. तसेच हिंदू सण साजरे करत भक्तीचा आनंद लूटता येणार आहे. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती असेल तर मंदिर निधीचा वापर मदतकार्य करिता केला जाणार आहे. या भव्य मंदिराच्या बांधकामासाठी तब्बल 600 कोटींचा खर्च येणार असल्याची माहिती समोर येत आहे.






