Xi Jinping’s secret letter urged India to join China against US tariffs revealed after 5 months
Xi Letter Revelation : आंतरराष्ट्रीय राजकारणात एक गुप्त पत्र सध्या चर्चेत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अमेरिकेला टॅरिफ युद्धात पराभूत करण्यासाठी भारताची साथ मागितल्याचे या पत्रातून उघड झाले आहे. विशेष म्हणजे, हे पत्र थेट भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मार्च २०२५ मध्ये लिहिले गेले होते. मात्र, त्याचा मजकूर तब्बल पाच महिन्यांनंतर सार्वजनिक झाला. ब्लूमबर्गने हे गुप्त पत्र उघड करताच जगभरात खळबळ उडाली आहे.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, जिनपिंग यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांविरोधात एक व्यापक योजना तयार केली होती. या योजनेत भारताला सामील होण्याचे आवाहन करण्यात आले होते. अमेरिकन टॅरिफ हे चीनच्या आर्थिक हितांसाठी अत्यंत हानिकारक असल्याचे जिनपिंग यांनी पत्रात नमूद केले होते. त्यांनी भारताशी सहकार्य केल्यास या टॅरिफ युद्धाला निर्णायक उत्तर देता येईल, असा त्यांचा विश्वास होता. जिनपिंग यांनी या पत्रात एका “विशेष व्यक्तीचा” उल्लेख केला होता. त्यांची भूमिका कराराच्या भवितव्यासाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे म्हटले गेले. मात्र, ब्लूमबर्गने त्या व्यक्तीचे नाव जाहीर केलेले नाही. त्यामुळे जागतिक राजकीय विश्लेषकांच्या कुतूहलात आणखी भर पडली आहे.
हे पत्र भारताला मार्च २०२५ मध्ये मिळाले असले तरी भारताने लगेच कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. जून २०२५ पर्यंत नवी दिल्लीने मौन बाळगले. अखेर जेव्हा चीन-अमेरिका व्यापार युद्ध शमू लागले, तेव्हा भारताने चीनशी संबंध सुधारण्याच्या पुढाकारावर प्रतिक्रिया दिली. या काळात भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी चीनला भेट दिली. त्याचबरोबर चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी नवी दिल्ली गाठली. या राजनैतिक हालचालींमुळे भारत-चीन संबंध नव्या दिशेने पुढे जात असल्याचे संकेत मिळाले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : किल ट्रम्प – Nuke India…मिनियापोलिस हल्ल्याचे थरारक सत्य; हल्लेखोराच्या विकृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर VIRAL
विश्लेषकांच्या मते, डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन मोठ्या राजनैतिक चुका केल्या.
भारत-पाकिस्तान युद्धबंदीबद्दलचे दावे – ट्रम्प यांनी पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्यात अमेरिकेची भूमिका असल्याचा दावा केला. या विधानामुळे भारत संतापला.
भारतावर ५० टक्के कर लादण्याची घोषणा – या निर्णयामुळे भारत-अमेरिका संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली.
या दोन घटनांनी भारताचा अमेरिकेवरील विश्वास हादरला. परिणामी, भारताने चीनसोबत चर्चेला सुरुवात केली. यामुळे अमेरिकेने दक्षिण आशियातील आपला जुना आणि विश्वासू मित्र गमावल्याचे चित्र स्पष्ट झाले.
चीनला ठाऊक आहे की भारताशिवाय आशियातील व्यापाराचे समीकरण पूर्ण होऊ शकत नाही. अमेरिकन टॅरिफमुळे चीनची बाजारपेठ कमकुवत होत असताना भारताचा पाठिंबा मिळणे, हे बीजिंगसाठी रणनीतिकदृष्ट्या मोठे यश ठरले असते. म्हणूनच जिनपिंग यांनी हे पत्र गुप्त ठेवून थेट राष्ट्रपती मुर्मू यांना लिहिले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Infiltration Via Nepal : भारतात पुन्हा जैशच्या 3 टेररिस्ट ची घुसखोरी; नेपाळच का ठरतोय दहशतवाद्यांसाठी ‘गोल्डन गेटवे’?
सध्या भारताने चीनसोबत संवाद वाढवला असला तरी दिल्ली अजूनही कोणत्याही औपचारिक कराराच्या भूमिकेत नाही. मात्र, या गुप्त पत्रामुळे जागतिक राजकारणातील नवा समीकरणांचा खेळ उघड झाला आहे. अमेरिका, चीन आणि भारत – या तिघांमध्ये येणाऱ्या काळात कोण कोणासोबत राहील, हेच जगाच्या नजरेतले मोठे कोडे ठरणार आहे.