
फोटो सौजन्य - Social Media
दुचाकी प्रेमींची उत्सुकता वाढवत कावासाकी इंडियाने आपली दमदार २०२६ कावासाकी Z1100 भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. जागतिक स्तरावर सप्टेंबर २०२५ मध्ये पदार्पण केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत ही दमदार बाईक भारतात दाखल झाली. १२.७९ लाख (एक्स-शोरूम) किंमतीत उपलब्ध झालेली ही बाईक आता अधिकृतपणे बुकिंगसाठी खुली असून या महिन्यापासून डिलिव्हरी सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अत्याधुनिक वैशिष्ट्ये, दमदार इंजिन आणि उच्च दर्जाची राइडिंग परफॉर्मन्स यामुळे ही बाईक भारतीय बाजारात जोरदार स्पर्धा देईल अशी अपेक्षा आहे.
नवीन Z1100 ही निन्जा 1100SX कडून घेतलेल्या अॅल्युमिनियम ट्विन-ट्यूब फ्रेमवर आधारित आहे, ज्यामुळे बाईकला अधिक स्थिरता आणि हलकेपणा प्राप्त झाला आहे. सस्पेंशन सेटअपमध्ये पूर्णपणे अॅडजस्टेबल फ्रंट फोर्क्स आणि मोनोशॉक रियरचा समावेश आहे, ज्यामुळे शहरातील राइड असो की लांब पल्ल्याचा महामार्ग, दोन्ही परिस्थितीत उत्तम राइड गुणवत्ता मिळते. ब्रेकिंगची जबाबदारी टोकिकोच्या रेडियल कॅलिपर्सकडे देण्यात आली असून समोर ३१० मिमी ड्युअल डिस्क आणि मागे एक शक्तिशाली सिंगल डिस्क देण्यात आला आहे. सुरक्षिततेसाठी ड्युअल-चॅनेल ABS मानक स्वरूपात देण्यात आले आहे. १७-इंच अलॉय व्हील्स आणि डनलॉप स्पोर्टमॅक्स Q5A टायर्समुळे हाय-स्पीडवरही स्थिरता कायम राहते, तसेच कॉर्नरिंगदरम्यान अतिरिक्त विश्वास मिळतो. समोर 120/70 ZR17 आणि मागे 190/50 ZR17 टायर्स देण्यात आले आहेत, जे या बाईकच्या परफॉर्मन्स कॅरेक्टरला अधिक धारदार करतात.
परफॉर्मन्सबाबत बोलायचे झाले तर ही बाईक खऱ्या अर्थाने कावासाकीच्या डीएनएचे दर्शन घडवते. २०२६ Z1100 मध्ये १०९९ सीसी लिक्विड-कूल्ड, इनलाइन-फोर इंजिन देण्यात आले असून हे इंजिन निन्जा 1100SX वरून प्रेरित आहे. ९००० RPM वर तब्बल १३६ एचपी आणि ७६०० RPM वर ११३ Nm टॉर्क निर्माण करणारे हे इंजिन मध्यम श्रेणीतील टॉर्कवर भर देते. त्यामुळे शहरातील ट्रॅफिकमध्येही बाईक चपळतेने चालते आणि महामार्गावर गती घेताना कोणतीही अडचण जाणवत नाही. ६-स्पीड गिअरबॉक्स, असिस्ट आणि स्लिपर क्लच तसेच बायडायरेक्शनल क्विकशिफ्टरमुळे गिअर बदलणे अत्यंत मऊ आणि सहज होते. या बाईकचा कमाल वेग २५० किमी प्रतितासपर्यंत पोहोचू शकतो, मात्र गती वाढवताना तिचा प्रवेग देखील तितकाच स्मूथ राहतो. इंधन कार्यक्षमतेबाबत कावासाकीचा अंदाज १५ ते १८ किमी प्रति लिटर असा आहे आणि यासाठी किफायतशीर राइडिंग इंडिकेटरचीही सुविधा देण्यात आली आहे.
संपूर्णतः पाहता, कावासाकी Z1100 ही आधुनिक तंत्रज्ञान, दमदार इंजिन आणि उच्च दर्जाच्या सुरक्षा सुविधांनी सज्ज असलेली प्रीमियम स्पोर्ट्स रोडस्टर आहे. भारतीय बाजारात आता या सेगमेंटमधील स्पर्धा आणखी चुरशीची होणार असून परफॉर्मन्स-केंद्रित रायडर्ससाठी ही बाईक एक आकर्षक पर्याय ठरणार आहे.