'या' व्यक्तीने एकाच दिवशी खरेदी केली 3 Rolls-Royce
आपल्याकडे बजेट फ्रेंडली कारची जरी विक्री मोठ्या प्रमाणात होत असली तरी आजही लक्झरी कारचा एक वेगळाच चाहता वर्ग पाहायला मिळतो. कित्येकांचे तर स्वप्न असते की त्यांच्याकडे लक्झरी कार असावी. देशात अनेक सेलिब्रेटी आणि उद्योगपतींच्या ताफ्यात लक्झरी कार्सचा समावेश असतो. अशाच एका मराठी उद्योगपतीने एक नव्हे तर तीन रोल्स-रॉईस कार खरेदी केल्या आहेत. विशेष म्हणजे हे उद्योगपती कोल्हापूरचे आहेत.
भारतीय उद्योजक संजय घोडावत यांनी एका दिवसात तब्बल तीन Rolls-Royce कार्स खरेदी केल्या आहेत. यात Rolls-Royce Cullinan Series II, Ghost Series II आणि Spectre EV यांचा समावेश आहे. या तिन्ही लक्झरी कार्सची एकूण किंमत तब्बल 27 कोटी असल्याचे सांगितले जाते. चला तर, त्यांच्या या आलिशान कार कलेक्शनवर एक नजर टाकूया.
कार खरेदी करू की दिवाळीपर्यंत थांबू? खरंच छोट्या कारवरील GST कमी होणार?
Rolls-Royce Cullinan Series II ही जगातील सर्वात आलिशान SUV पैकी एक मानली जाते. संजय घोडावत यांनी ही कार Iguazu Blue या रंगात निवडली आहे. यात पातळ एलईडी हेडलाइट्स, L-आकाराचे डीआरएल, नवे फ्रंट ग्रिल आणि एलॉय व्हील्स दिले गेले आहेत. कारच्या आतील भागात Gallery ग्लास पॅनेल आणि नवीन Spirit इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. ही कार 6.75 लिटर ट्विन-टर्बो V12 इंजिनवर (571 bhp, 850 Nm) चालते आणि याची एक्स-शोरूम किंमत 10.50 कोटींपासून सुरू होते.
Rolls-Royce Ghost Series II ही या लक्झरी सेडानची दुसरी जनरेशन असून ती संजय घोडावत यांनी Bohemian Red या रंगात खरेदी केली आहे. यात नव्या डिझाइनचे हेडलाइट्स, बंपर आणि व्हील्स दिले आहेत. ड्रायव्हिंग अनुभव आणि लक्झरीच्या बाबतीत ही कार अत्याधुनिक मानली जाते. यात 6.75-लिटर V12 इंजिन असून ते 563 bhp पॉवर आणि 850 Nm टॉर्क निर्माण करते. याची एक्स-शोरूम किंमत सुमारे 8.95 कोटी आहे.
Honda Elevate Vs Maruti Grand Vitara फीचर्स, मायलेज आणि किंमतीच्या बाबतीत कोणती कार आहे सुपर बेस्ट?
Rolls-Royce Spectre EV ही या ब्रँडची पहिली इलेक्ट्रिक कार आहे. ही कार संजय घोडावत यांनी Imperial Jade म्हणजे हिरव्या रंगात निवडली आहे. यात 102 kWh बॅटरी असून WLTP प्रमाणे तिची रेंज 530 किमीपर्यंत आहे. दोन मोटर्सचा सेटअप असून तो एकत्रितपणे 585 bhp पॉवर आणि 900 Nm टॉर्क निर्माण करतो. वजनदार असतानाही ही इलेक्ट्रिक कार फक्त 4.5 सेकंदांत 0–100 किमी/ता स्पीड पकडते. याची सुरुवातीची किंमत 7.5 कोटी आहे.
या तिन्ही कार्सच्या डिलिव्हरीचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये संजय घोडावत या तिन्ही Rolls-Royce कार्सच्या मध्ये उभे दिसत आहेत.
संजय घोडावत हे Sanjay Ghodawat Group (SGG)चे चेअरमन आहेत. त्यांचा व्यवसाय ऊर्जा, विमान सेवा आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रांत पसरलेला आहे. याशिवाय ते Sanjay Ghodawat University चे अध्यक्षही आहेत.