फोटो सौजन्य- सोशल मीडिया
निसान इंडियाने त्यांच्या अद्ययावत मॅग्नाईट (Nissan Magnite) फेसलिफ्ट एसयूव्हीचे निर्यात कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू केले आहे. एका महिन्यात कंपनीने 2,700 हून अधिक युनिट्स निर्यात केली आहेत, जे त्यांच्या देशांतर्गत विक्रीशी (3,119 युनिट्स) जवळजवळ तितकेच आहे. यामुळे निसानच्या देशांतर्गत विक्री आणि निर्यातीत उल्लेखनीय समतोल राखला गेला आहे.
दक्षिण आफ्रिकेला निर्यातीची सुरुवात
निसानने या फेसलिफ्टचे पहिले बॅच दक्षिण आफ्रिकेला पाठवले आहे. भारतात 4 ऑक्टोबर रोजी लॉन्च झालेली ही अपडेटेड कॉम्पॅक्ट एसयूव्ही, चेन्नईतील रेनॉल्ट-निसान अलायन्सच्या प्रोडक्शन प्लांटमध्ये तयार केली जाते. निसानने लॉन्चवेळी जाहीर केले होते की मॅग्नाईट फेसलिफ्ट 65 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाईल, ज्यामध्ये डाव्या हाताच्या ड्राइव्ह मॉडेल्सही समाविष्ट आहेत. 2020 मध्ये मॅग्नाईट बाजारात आल्यापासून, जागतिक स्तरावर तिची 1.5 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे, जी तिच्या लोकप्रियतेचे द्योतक आहे.
किंमत, वैशिष्ट्ये आणि इंजिन
मॅग्नाईट फेसलिफ्टची भारतात एक्स शो रुम किंमत ही 5.99 लाखांपासून सुरू होते आणि 11.50 लाखांपर्यंत जाते. या गाडीमध्ये टॉप व्हेरियंटसाठी उत्कृष्ट इंटिरियर्स, आकर्षक डिझाईन आणि किफायतशीर दरामध्ये अनेक फीचर्स दिले आहेत. कारचे मुख्य आकर्षण म्हणजे 100hp चा 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन, ज्यामध्ये मॅन्युअल आणि CVT गिअरबॉक्स पर्याय आहेत. हे इंजिन त्याच्या दमदार परफॉर्मन्ससाठी ओळखले जाते.
याशिवाय, 72hp चा 1.0-लिटर पेट्रोल इंजिन पर्यायही उपलब्ध आहे, ज्यात मॅन्युअल आणि AMT ट्रान्समिशन दिले गेले आहे. मात्र, या किमतीत सध्या सामान्य झालेला सनरूफ फीचर किंवा काही अत्याधुनिक वैशिष्ट्ये यात नाहीत, ज्यामुळे ती प्रतिस्पर्ध्यांशी याबाबतीत जरी मागे पडत असली तरीही इतर बाबींमुळे कार ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. सप्टेंबरमध्ये या कारची भारतामधील विक्री ही 2100 इतकी होती मात्र ऑक्टोबर या सणासुदीच्या महिन्यात मॅग्नाईटच्या विक्रीत जवजवळ 50 टक्क्यानी वाढ होत झाली कारचे तब्बल 3119 युनिट्स विक्री झाली. पहिल्यांदाच कारच्या 3 हजारहून अधिक युनिट्सची विक्री झाल्याने कंपनीत उत्साहाचे वातावरण होते.
कंपनीची जागतिक बाजारपेठेत विस्ताराची योजना
निसानने मॅग्नाईट फेसलिफ्टसाठी मोठ्या निर्यात योजनेवर काम सुरू केले आहे. भारतात तयार होणाऱ्या या गाडीने जागतिक स्तरावर मागणी निर्माण केली असून, तिच्या गुणवत्तेचा आणि किमतीचा समतोल यामुळे ती जागतिक बाजारपेठेत प्रतिस्पर्ध्यांशी यशस्वीपणे सामना करू शकते. भारतात आणि परदेशात या मॉडेलला मिळत असलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे, निसानने आपल्या जागतिक विस्ताराच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मॅग्नाईट फेसलिफ्टमुळे निसानला भारतीय आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या मनात आपले स्थान आणखी बळकट करण्याची संधी मिळत आहे.