फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये विविध प्रकारच्या कार्स उपलब्ध असल्या तरी, SUV सेगमेंटला सर्वाधिक मागणी आहे. दमदार लूक, उंच ग्राउंड क्लीयरन्स आणि फिचर्समुळे SUV कार्सना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. हीच मागणी लक्षात घेता, विविध ऑटो कंपन्या आपापल्या अत्याधुनिक SUVs ला भारतीय बाजारात सादर करत आहेत. आता या सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक SUV देखील दाखल होऊ लागल्या आहेत. पर्यावरणपूरक तंत्रज्ञान, उत्तम परफॉर्मन्स आणि आधुनिक फीचर्ससह इलेक्ट्रिक SUV नव्या युगाची सुरुवात करत आहेत.
सध्या भारतातील एकूण कार विक्रीत एकट्या एसयूव्ही सेगमेंटचा वाटा हा 50 टक्क्यांहून अधिक आहे. यावरून समजते की देशात एसयूव्हीची किती मोठी क्रेझ आहे. त्यात प्रिल 2025 मध्ये महिंद्राची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली. महिंद्राने या महिन्यात एकूण 52,330 एसयूव्ही विक्री केल्या असून, ही आकडेवारी ह्युंदाई आणि टाटा मोटर्सच्या विक्रीपेक्षा जास्त आहे. दमदार डिझाइन, विश्वासार्ह इंजिन आणि ग्राहकांचा वाढता कल यामुळे महिंद्राच्या एसयूव्हींना बाजारात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. स्कॉर्पिओ, थार, बोलेरो आणि एक्सयूव्ही700 यांसारख्या लोकप्रिय मॉडेल्समुळे कंपनीने विक्रीत आघाडी घेतली आहे.
गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल 2025 मध्ये मारुती सुझुकीनंतर महिंद्रा ही देशातील सर्वात मोठी कार विकणारी कंपनी होती. तर टाटा मोटर्स या विक्रीच्या यादीत तिसऱ्या स्थानावर होती. या काळात टाटा मोटर्सने एकूण 45,199 कार विकल्या. तर ह्युंदाई इंडिया दुसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरली. या कालावधीत, ह्युंदाईला एकूण 44,374 नवीन ग्राहक मिळाले. परंतु, या काळात ह्युंदाईच्या विक्रीत वार्षिक आधारावर 12 टक्क्यांनी घट झाली आहे.
एकीकडे ह्युंदाई विक्रीच्या यादीत दुसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरली असली तरी कंपनीची क्रेटा सलग दुसऱ्या महिन्यात देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. या काळात ह्युंदाई क्रेटाने 17,000 हून अधिक एसयूव्ही विकल्या आहेत. तसेच कंपनीच्या एकूण कार विक्रीत एकट्या ह्युंदाई क्रेटाचा शेअर हा 70.90 टक्के होता. या सेलमध्ये ह्युंदाई क्रेटाचे इलेक्ट्रिक मॉडेल देखील समाविष्ट होते.