फोटो सौचन्य: iStock
देशभरात दिवाळीचा जलोष पाहायला मिळत आहे. या शुभ काळात अनेक जण आपल्या जिवलग व्यक्तींना, मित्रमैत्रिणींना भेटत असतात, त्यांच्यासाठी मिठाईचे बॉक्स घेऊन जातात. तसेच काही जण शुभ प्रसंगी नवीन कार किंवा बाईक घेऊन नवी सुरुरवात करत असतात. या काळात कार्सची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे प्रत्येक ऑटो कंपनी आपल्या कार्सवर आकर्षित डिस्कॉउंट्स ऑफर करत असते. तर कित्येक कंपनीज दिवाळीच्या शुभमुहूर्तावर नवीन कार सुद्धा लाँच करतात.
फक्त दिवाळीच नाही तर अन्य काळात सुद्धा कार्सची विक्री मोठ्या प्रमाणात होताना दिसत असते. परंतु आता ऑटोमोबाइल क्षेत्रासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार 10 लाख किंमतीच्या कार्सच्या विक्रीत घट झाली आहे.
हे देखील वाचा: Electric Car विकत घेण्याअगोदर करा ‘ही’ कामं, न केल्यास होईल पश्चाताप
मारुती सुझुकीचे चेअरमन आरसी भार्गव यांनी सांगितले की 10 लाख किंमतीच्या कार्सच्या विक्रीत घट झाली आहे. ही चिंतेची बाब आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले. एकेकाळी याच कारचा एकूण विक्रीत 80% वाटा होता. यामागील कारणांवर सुद्धा भार्गव यांनी भाष्य केले. ते म्हणतात या विक्रीतील घट होण्यामागचे कारण म्हणजे लोकांचे डिस्पोजेबल ( सर्व कर भरल्यानंतर शिल्लक राहणारी रक्कम) उत्पन्न कमी आहे.
भार्गव म्हणाले की, वारंवार घडणाऱ्या घटनांवरून असे दिसून येते की लोकांचे डिस्पोजेबल उत्पन्न कमी आहे. कंपनीच्या तिमाही निकालांबाबत झालेल्या परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
भार्गव म्हणाले की, या विभागातील विक्रीच्या कमतरतेमुळे ऑटोमोबाईल मार्केटमध्ये एकूणच वाढ झालेली नाही. या स्तरावर बाजारपेठेत पुन्हा वाढ होण्यासाठी, लोकांकडे अधिक डिस्पोजेबल उत्पन्न असणे आवश्यक आहे. तथापि, सणासुदीच्या काळात एकूण किरकोळ विक्री 14% वाढेल अशी कंपनीची अपेक्षा आहे.
हे देखील वाचा: दिवाळीत फटाक्यांपासून वाहनांचे कसे कराल संरक्षण? दुर्लक्ष केल्यास उडेल आगीचा भडका
सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) च्या आकडेवारीनुसार, 2018-19 मध्ये 10 लाख रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या कारचा बाजारातील हिस्सा 80% होता. त्या काळात भारतात प्रवासी वाहनांची विक्री 33,77,436 युनिट्स होती. 10 लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या प्रवासी वाहनांचा हिस्सा आता बाजारात 50% पेक्षा कमी आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात देशातील प्रवासी वाहनांच्या विक्रीने 42,18,746 युनिट्सचा विक्रमी उच्चांक गाठला होता.
भार्गव म्हणाले की, या विभागाची बाजारपेठ सध्या वाढत नाही. हे चिंतेचे कारण आहे. केवळ महागड्या कारच्या विक्रीमध्ये वाढ होत आहे. देशांतर्गत प्रवासी वाहनांच्या बाजारपेठेतील मंदी हे चिंतेचे कारण आहे का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता ज्यावर त्यांनी आपले विचार मांडले होते.