
ऑगस्ट २०२६ मध्ये भारतातील प्रवासी वाहनांची एकूण नोंदणी वर्षाकाठी १६ टक्क्यांनी वाढून ३,९६,२६९ युनिट्सवर पोहोचली आहे. मात्र, जुलै महिन्याच्या तुलनेत यात ५.८ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे. भारतीय कार बाजारात मारुती सुझुकीने तब्बल ४१.८ टक्के बाजारपेठेवर ताबा मिळवत आपले वर्चस्व अबाधित ठेवले आहे.
ऑगस्ट महिन्यात मारुती सुझुकीच्या १,६५,८३० गाड्यांची नोंदणी झाली असून कंपनीने वार्षिक स्तरावर २२.८ टक्क्यांची दमदार वाढ नोंदवली आहे. मारुतीची ही कामगिरी दुसऱ्या क्रमांकावरील टाटा मोटर्सपेक्षा १ लाख युनिट्सने जास्त आहे. टाटा मोटर्सने ५६,५६५ युनिट्सच्या विक्रीसह बाजारात दुसरं स्थान मजबूत केलं असून कंपनीने वार्षिक स्तरावर ४०.६ टक्क्यांची मोठी झेप घेतली आहे. टाटा मोटर्सचा एकूण बाजारातील वाटा १४.३ टक्क्यांवर पोहोचला आहे.
दुसऱ्या बाजूला, ५०,५१९ युनिट्ससह महिंद्रा कंपनी तिसऱ्या क्रमांकावर राहिला. महिंद्राची वार्षिक वाढ ४.३ टक्के राहिली असली तरी जुलैच्या तुलनेत नोंदणीत १४.२ टक्क्यांची घट झाली आहे. त्यानंतर ४६,९८८ युनिट्ससह हुंडई चौथ्या स्थानावर आहे, ज्यांनी वार्षिक स्तरावर ४.८ टक्क्यांची वाढ दाखवली.
टोयोटा (२५,०१२ युनिट्स) आणि किया (२३,३७२ युनिट्स) अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर आहेत. टोयोटाच्या विक्रीत १० टक्क्यांची घट झाली, तर कियाने १७.६ टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवली. स्कोडा आणि फॉक्सवॅगन यांनी संयुक्तपणे ७,४५८ युनिट्सची विक्री केली, ज्यामध्ये १७.५ टक्क्यांची घसरण झाली आहे. एमजी कंपनी ५,७८४ युनिट्ससह आठव्या स्थानावर राहिली.
ऑगस्ट महिन्यात काही कंपन्यांनी अनपेक्षित आणि उत्कृष्ट वाढ नोंदवली. होंडाने ४,९६८ युनिट्ससह १२.४ टक्के, तर रेनॉने ३,२७५ युनिट्ससह २५.१ टक्क्यांची वार्षिक वाढ मिळवली. सर्व प्रस्थापित ब्रँड्समध्ये निसानने सर्वाधिक ८३.६ टक्क्यांची जबरदस्त वार्षिक वाढ नोंदवत २,७५८ युनिट्सची विक्री केली.
नवीन इलेक्ट्रिक कार कंपनी विनफास्टने २,१९९ युनिट्सची नोंदणी करत जुलैच्या तुलनेत ४३.५ टक्क्यांची मोठी सुधारणा दाखवली. सिट्रॉनने ८१२ युनिट्ससह ७६.९ टक्क्यांची वाढ नोंदवली. या यादीच्या शेवटी बीवायडी (५४३ युनिट्स) आणि जीप (१८६ युनिट्स) या कंपन्या राहिल्या, ज्यांच्या विक्रीत वार्षिक घसरण पाहायला मिळाली. संपूर्ण ऑटो क्षेत्राचा विचार करता ऑगस्ट महिना हा वार्षिक वाढीचा परंतु मासिक स्तरावर काहीसा मंदावलेला राहिला.