
जीएसटी कपातीमुळे वाहन विक्रीला 'अच्छे दिन'; नोव्हेंबरमध्ये झाली तब्बल 4.12 लाख वाहनांची विक्री
नवी दिल्ली : केंद्र सरकारने वस्तू आणि सेवा कर अर्थात GST मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे सणासुदीच्या हंगामानंतरही मागणीत वाढ होत असल्याचे दिसून आले. भारतात प्रवासी वाहनांची घाऊक विक्री वर्षानुवर्षे 18.7 टक्के वाढून 412405 युनिट्सचा नवा विक्रम झाला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एकूण 347522 प्रवासी वाहने विकली गेली.
‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम)’ ने शुक्रवारी याबाबतची आकडेवारी जाहीर केली. या जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने गेल्या महिन्यात एकूण १७०९७१ प्रवासी वाहने विकली. नोव्हेंबर २०२४ मध्ये विकल्या गेलेल्या १४१३१२ प्रवासी वाहनांपेक्षा ही २१ टक्के वाढ आहे. त्यात महिंद्रा अँड महिंद्राची घाऊक विक्री २२% वाढून ४६२२२ युनिट्सवरून ५६३३६ युनिट्सवर पोहोचली. या कालावधीत ह्युंदाई मोटर इंडियाने ५०३४० प्रवासी वाहनांची विक्री केली, जी वर्षानुवर्षे चार टक्के वाढ आहे.
दरम्यान, सणासुदीच्या हंगामानंतर आणि सरकारच्या जीएसटी सुधारणांनंतरही मजबूत मागणीमुळे देशांतर्गत ऑटोमोटिव्ह उद्योगाने नोव्हेंबरमध्ये विक्रीचा वेग कायम ठेवला आहे. प्रवासी वाहने, दुचाकी आणि तीनचाकी वाहनांनी नोव्हेंबरमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवली. सतत पाठिंबा देणाऱ्या धोरणात्मक सुधारणा आणि सुधारित बाजार भावनांमुळे २०२६ मध्ये ही वाढ कायम राहण्याची अपेक्षा आहे.
निर्यातीत लक्षणीय वाढ
गेल्या महिन्यात प्रवासी, दुचाकी आणि तीनचाकी वाहनांची निर्यात ९६.३ टक्क्यांनी वाढली. प्रवासी वाहनांची निर्यात ३९.८ टक्क्यांनी वाढून ८४६४६ युनिट्सवर पोहोचली. कारची निर्यात १८.३ टक्क्यांनी वाढून ४०५१९ युनिट्सवर पोहोचली. दुचाकींची निर्यात ३०.१ टक्क्यांनी वाढून ४७१०१२ युनिट्सवर पोहोचली. तीनचाकी वाहनांची निर्यात ९६.३ टक्क्यांनी वाढून ४६०१३ युनिट्सवर पोहोचली.
वाहनांच्या विक्रीनेही गाठला नवीन उच्चांक
नोव्हेंबरमध्ये दुचाकी वाहनांची घाऊक विक्री १९४४,४७५ युनिट्सच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली, जी गेल्या वर्षी याच कालावधीत विकल्या गेलेल्या १६०४७४९ दुचाकींपेक्षा २१ टक्क्यांनी जास्त आहे. स्कूटर विक्री २९ टक्क्यांनी वाढून ७३५७५३ युनिट्सवर पोहोचली, जी गेल्या वर्षी याच कालावधीत ५६८५८० युनिट्स होती. गेल्या महिन्यात मोटारसायकल विक्री १७.५ टक्क्यांनी वाढून ११६३७५१ युनिट्सवर पोहोचली.
हेदेखील वाचा : IndiGo Crisis: इंडिगो संकटाचा फायदा उचलण्याच्या तयारीत TATA Group, एअर इंडिया पायलट्सची चिंता वाढीला; काय आहे कारण