
फोटो सौजन्य: iStock
अडेकोने 2025 मध्ये 2.16 लाख गिग व तात्पुरत्या नोकऱ्यांची शक्यता वर्तवली होती. मात्र फक्त तीन महिन्यांतच तात्पुरत्या नोकरभरतीत 37% तर गिग वर्कफोर्समध्ये 15-20% वाढ झाली. ही आकडेवारी सणासुदीच्या हंगामी मागणीची ताकद अधोरेखित करते.
दसऱ्यानंतर रिटेल, ई-कॉमर्स, बीएफएसआय, लॉजिस्टिक्स आणि हॉस्पिटॅलिटी या प्रमुख क्षेत्रांत भरतीची लाट आली. ई-कॉमर्समध्ये दिवाळीत 24% वाढ, तर क्विक कॉमर्समध्ये 120% वाढ नोंदली गेली. यातही टियर-2 शहरांतूनच या मागणीत सर्वाधिक वाढ दिसली.
रिटेल–ई-कॉमर्स क्षेत्रात तात्पुरत्या कर्मचाऱ्यांची मागणी 28% ने वाढली. विक्री, गोदाम मॅनेजमेंट आणि वितरण यांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज निर्माण झाली.
ऑनलाइन ऑर्डर्सच्या वाढत्या संख्येमुळे लॉजिस्टिक्स आणि लास्ट-माईल डिलिव्हरी क्षेत्रात
35–40% वाढ नोंदवली गेली. जलद डिलिव्हरीच्या अपेक्षेमुळे वाहतूक कंपन्यांनी मनुष्यबळ आणि यंत्रणा वाढवली.
टियर 2 आणि 3 शहरांमध्ये प्रत्यक्ष विक्री, क्रेडिट कार्ड सेवा, पॉइंट-ऑफ-सेल यांसारख्या भूमिकांसाठी मागणी वाढून 30% वाढ नोंदीस आली. तसेच हॉस्पिटॅलिटी आणि ट्रॅव्हल क्षेत्रात देखील नोकरभरतींमध्ये 25% वाढ झाली आहे.
दिल्ली-एनसीआर, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई येथे 75–80% तात्पुरती भरती झाली. तसेच लखनऊ, जयपूर, कोईंबतूर, भुवनेश्वर, नागपूर आणि म्हैसूर यांसारख्या शहरांत २१% वाढ नोंदली गेली. कानपूर, कोची, विजयवाडा आणि वाराणसी या नवोदित बाजारपेठांमध्ये १८–२०% वाढ दिसली.
या कालावधीत कर्मचाऱ्यांच्या वेतनातही सुधारणा झाली—
नवीन कर्मचाऱ्यांचे वेतन : 12–15% वाढ
अनुभवी कर्मचाऱ्यांचे वेतन : 18–22% वाढ
महिलांचा सहभाग रिटेल, ग्राहक सहाय्यता, लॉजिस्टिक्स आणि BFSI क्षेत्रात 30–35% वाढला.
अडेको इंडियाचे संचालक आणि जनरल स्टाफिंग प्रमुख दीपेश गुप्ता म्हणाले, “यंदा भारतात मोठ्या प्रमाणावर नोकरभरती झाली. ही वाढ आर्थिक आत्मविश्वास आणि गिग अर्थव्यवस्थेची परिपक्वता याचे द्योतक आहे. गिग व तात्पुरत्या नोकऱ्यांत गेल्या वर्षाच्या तुलनेत 25% वाढ झाली असून कोविडनंतरचे हे सर्वात मजबूत वर्ष ठरले आहे.”
विवाह हंगाम आणि आगामी सणांमुळे ही भरती लाट मार्च 2026 पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. अडेकोच्या अंदाजानुसार, पुढील काळात तात्पुरत्या रोजगारात दरवर्षी 18–20% वाढ होईल आणि या वाढीत टियर-2 आणि टियर -3 शहरे अर्धा वाटा उचलतील.