Amazon India Investment: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
अॅमेझॉनने आज घोषणा केली आहे की कंपनी २०३० पर्यंत भारतातील अक्षय ऊर्जा (रिन्युएबल एनर्जी) प्रकल्पांमध्ये ७ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. यापूर्वी करारबद्ध केलेल्या ४ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीव्यतिरिक्त ही नवीन गुंतवणूक असून, यामुळे भारताच्या शाश्वत आणि लवचिक ऊर्जा भविष्याला मोठे पाठबळ मिळणार आहे. यासोबतच कंपनीने कर्नाटक, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये एकूण ९३४ मेगावॅट क्षमतेच्या चार नवीन पवन आणि सौरऊर्जा प्रकल्पांची घोषणा केली आहे. Amazon India Investment:
या नवीन प्रकल्पांमध्ये कर्नाटकातील २३४ मेगावॅटचा पवन ऊर्जा प्रकल्प (जो अॅमेझॉनचा आशियातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे) आणि २०० मेगावॅटचा सौर-पवन एकत्रित प्रकल्प, मध्य प्रदेशातील ३०० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प व राजस्थानातील २०० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प यांचा समावेश आहे. विद्यमान ४ अब्ज डॉलर्सच्या करारांतर्गत असलेले हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर त्यांची एकत्रित क्षमता २ गिगावॅटपेक्षा अधिक होईल, जी भारतातील ३५ लाखांहून अधिक कुटुंबांच्या वार्षिक विजेच्या गरजेइतकी वीज निर्माण करण्यास सक्षम असेल. सध्या भारतात कंपनीचे एकूण ५७ अक्षय ऊर्जा प्रकल्प आहेत.
Wholesale Inflation October 2026: महागाईचा भडका कायम!; ऑक्टोबरमध्ये घाऊक महागाई दर १२.२९ टक्क्यांवर
या गुंतवणुकीचे स्वागत करताना केंद्रीय नवीन व अक्षय ऊर्जा मंत्री श्री. प्रल्हाद जोशी म्हणाले, “भारतातील अक्षय ऊर्जा क्षेत्रातील अॅमेझॉनच्या सातत्यपूर्ण गुंतवणुकीचे आम्ही स्वागत करतो. अशा गुंतवणुका भारताच्या स्वच्छ ऊर्जेच्या महत्त्वाकांक्षा पुढे नेण्यात, ऊर्जा सुरक्षा प्रबळ करण्यात आणि शाश्वत आर्थिक विकासाला पाठबळ देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. यातून भारताच्या अक्षय ऊर्जा क्षेत्रावरील जागतिक कंपन्यांचा वाढता विश्वास दिसून येतो.”
अॅमेझॉनच्या चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर कारा हर्स्ट म्हणाल्या, “७ अब्ज अमेरिकन डॉलर्सची ही अतिरिक्त गुंतवणूक भारताप्रती आमची दीर्घकालीन कटिबद्धता अधोरेखित करते. मोठ्या प्रमाणावर अक्षय ऊर्जेची उपलब्धता वाढवून भारताची वाढती विजेची मागणी पूर्ण करणे, ऊर्जा सुरक्षा दृढ करणे आणि २०७० पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जन साध्य करण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टात योगदान देणे हे आमचे ध्येय आहे.”
या गुंतवणुकीमुळे २०३० पर्यंत आपल्या कामकाजासाठी वापरल्या जाणाऱ्या विजेची कार्बन तीव्रता (२०१९ च्या तुलनेत) ६५ टक्क्यांनी कमी करण्याचे आणि ‘द क्लायमेट प्लेज’ अंतर्गत २०४० पर्यंत निव्वळ-शून्य कार्बन साध्य करण्याचे अॅमेझॉनचे उद्दिष्ट अधिक बळकट होणार आहे.
Diesel Tax Hike: डिझेलवरील करात वाढ; पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार की आणखी काही बदलणार?
ऊर्जा क्षेत्रासोबतच अॅमेझॉनने ५०० हून अधिक शहरांमध्ये १५,००० पेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहने तैनात केली असून ३,००० इलेक्ट्रिक ट्रकसाठी टाटा मोटर्ससोबत भागीदारी केली आहे. कंपनीने २०२७ च्या लक्ष्यापूर्वीच २०२५ मध्ये भारतात ‘वॉटर-पॉझिटिव्ह’ दर्जा प्राप्त केला असून जल पुनर्भरण प्रकल्पांमध्ये ६२ कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली आहे. तसेच, ५० टक्क्यांहून अधिक ऑर्डर्स कमी किंवा मूळ पॅकेजिंगमध्ये पाठवल्या जातात आणि कृषी अवशेषांपासून पर्यायी पॅकेजिंग विकसित करण्यासाठी कंपनी आयआयटी रुरकीसोबत कार्यरत आहे.






