कांदा, मका उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली; बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे भाव कोसळणार!
बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेचा सर्वाधिक परिणाम हा भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर होणार आहे. सोमवारच्या बांग्लादेशातील घडामोडींनंतर आज (ता.६) भारत-बांग्लादेश सीमेवरून भारतीय कृषी मालाची निर्यात पूर्णपणे थांबली आहे. परिणामी, आता येत्या काळात बांगलादेशात भारतातून होणारी कांदा, मका यासह सर्वच निर्यात ठप्प असणार आहे. विशेष म्हणजे ही निर्यात अधिक काळ ठप्प राहिल्यास देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
देशांतर्गत आवक वाढून भाव कोसळणार
सध्याच्या घडीला शेजारी देश असलेला बांगलादेश हा भारतीय कांद्याचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ कमर्शियल इंटेलिजन्स अँड स्टॅटिस्टिक्स (डीजीसीआयएस) नुसार, 2023-24 या वर्षात भारतातून निर्यात झालेल्या एकूण कांदा निर्यातीपैकी 20.3 टक्के बांगलादेशात निर्यात झाला आहे. याआधीच्या वर्षांमध्येही बांगलादेश हा भारतीय कांद्याचा सर्वात मोठा आयातदार राहिला आहे.
अशातच आता बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेमुळे भारतीय कृषीमालाची निर्यात थांबली आहे. ज्यामुळे कृषी मालाची निर्यात घटल्यास देशांतर्गत बाजारात आवक वाढून भाव घसरतील. याचा विपरीत परिणाम भारतीय शेतकऱ्यांवर होणार आहे. प्रामुख्याने कांदा आणि मका या पिकांचे भाव घसरण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : शेतमालाच्या भौगोलिक मानांकनात महाराष्ट्र देशात पहिला; आतापर्यंत 38 पिकांना जीआय टॅग!
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका
भरीस भर म्हणून बांगलादेशच्या टका या चलनाचे डॉलरच्या तुलनेत सुमारे 20 टक्क्यांनी अवमूल्यन झाले आहे. तर परकीय चलनात घट झाल्याने, त्याचाही व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, बांगलादेशात होणारी भारतीय कृषी मालाची निर्यात अधिक काळ बंद राहिल्यास, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक फटका बसणार आहे.
कृषी निर्यात उत्पन्न 3.6 टक्क्यांवर
भारतातून बांगलादेशात गहू, मका, कापूस, तांदूळ, डाळी, कांदे आणि फळे आणि भाज्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. भारतातून निर्यात होणाऱ्या कृषी उत्पादनांमध्ये बांगलादेश नेहमी प्रथम आणि द्वितीय क्रमांकावर असतो. अर्थात निर्यातीच्या माध्यमातून बांगलादेशातून भारताला जास्तीत जास्त पैसा मिळतो.
गेल्या वर्षी त्यात लक्षणीय घट होऊन, बांग्लादेश सध्या सातव्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय भारताच्या एकूण कृषी निर्यात उत्पन्नात बांगलादेशचा वाटा 11 टक्क्यांहून अधिक होता. तो सध्या 3.6 टक्क्यांवर आला आहे. बांगलादेशात राजकीय अस्थिरतेचे वातावरण राहिल्यास कृषी मालाची निर्यात आणखी कमी होऊ शकते.