Maharashtra ranked first in the country in geographical indication of agricultural products
देशभरातील कृषी उत्पादनांना त्या-त्या भागातील गुणवैशिष्ट्यांमुळे आपली ओळख जपता यावी. यासाठी भौगोलिक मानांकन (जीआय टॅग) दिले जाते. शेतमालाल देशासह जगभरात विशेष ओळख आणि खास गुणवत्ता याची माहिती ग्राहकांना होण्यासाठी हे भौगोलिक मानांकन दिले जाते. अशातच आता कृषी उत्पादनांच्या या भौगोलिक मानांकनात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. भारतातील एकूण २०० कृषी उत्पादनांपैकी महाराष्ट्रातील ३८ कृषी उत्पादनांना भौगोलिक मानांकन अर्थात जीआय टॅग देण्यात आला आहे.
काय फायदा होतो जीआय टॅगचा?
एखाद्या पिकाचे विशिष्ट भागातच उत्पादन होत असेल. तसेच त्या उत्पादनाला काही विशिष्ट ओळख असेल तर त्याला भौगोलिक मानांकन दिले जाते. कोणत्याही उत्पादनाला भौगोलिक मानांकन मिळाल्यास त्या पिकाचे किंवा उत्पादनाचे उत्पादित स्थान निश्चित होते. भौगोलिक मानांकन प्राप्त पिकाच्या कार्यक्षेत्रातील संबंधित पिकाच्या उत्पादकांची भौगोलिक संकेत (नोंदणी व संरक्षण) अधिनियम 1999 अंतर्गत अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंदणी केल्यास भोगोलिक चिन्हांकनाचा लोगो लावून उत्पादनाची विक्री करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळण्यास मदत होते. याशिवाय ग्राहकांना योग्य आणि गुणवत्तापूर्ण माल मिळण्यास मदत होते.
अधिकृत वापरकर्त्यांच्या नोंदणीमध्ये 61 टक्के वाटा
कृषी उत्पादनाच्या देशात एकूण झालेल्या उत्पादकांची अधिकृत वापरकर्ता नोंदणीमध्ये महाराष्ट्राचा ६१ टक्के वाटा आहे. तसेच ५००० प्रस्तावांना देखील लवकरच मान्यता मिळून, अधिकृत वापरकर्ता नोंदणीत मोठी वाढ होणार आहे. राज्यात भौगोलिक मानांकन प्राप्त पिकाचे अधिकृत वापरकर्ता नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सन २०१९-२० अखेर १२३२ उत्पादकांची अधिकृत वापरकर्ता नोंदणी झाली होती. संचालक फलोत्पादन विभागामार्फत उत्पादकांची अधिकृत वापरकर्ता नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आल्याने, २०२४ अखेर ११४२३ उत्पादकांची अधिकृत वापरकर्ता नोंदणी झाली आहे.
हेही वाचा : बांग्लादेशातील राजकीय अस्थिरतेचा गंभीर परिणाम; भारतीय फळे-भाजीपाल्याची निर्यात थांबली!
जीआय मानांकन निर्यातीस ठरते लाभदायक
अधिकृत वापरकर्ता नोंदणीने भौगोलिक क्षेत्राशी निगडित मालास कायदेशीर संरक्षण प्राप्त होते. भौगोलिक चिन्हांकन मालास निर्यातीसाठी अधिक संधी उपलब्ध होतात. अशा नोंदणी करत कृषी मालास राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँडींग होण्यास मदत होते. व्यापारी चिन्हाला बाजारपेठेत जे महत्त्व असते. तेच महत्त्व कृषिमालाच्या भौगोलिक चिन्हांकनासह असते. त्यामुळे असे नोंदणी केलेल्या उत्पादनाच्या उत्पादकाला जास्तीचे आर्थिक उत्पन्न मिळून त्याच्या उन्नतीस हातभार लागतो. भौगोलिक मानांकन प्राप्तीमुळे भारतीय कृषी निर्यातीस जागतिक बाजारपेठेत निश्चितच लाभकारक ठरणार आहे.