भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने मध्य प्रदेश औद्योगिक विकास निगम (MPIDC) आणि इंडियन प्लास्ट पॅक फाउंडेशन (IPPF) यांच्या सहकार्याने इंदोर येथे एक महत्त्वपूर्ण गुंतवणूकदार बैठक यशस्वीरित्या आयोजित केली. “रेझोल्यूट भारत पेट्रोकेमिकल्सचा विस्तारता क्षितिज व भविष्याचा आराखडा” या थीम अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात, बीपीसीएलने बीना रिफायनरीच्या विस्तारासाठी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी ₹49 हजार कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा केली.
या भव्य प्रकल्पामुळे पॉलीप्रॉपिलीन, एचडीपीई/एलएलडीपीई, बेंझीन आणि टोल्यून यांसारख्या जागतिक दर्जाच्या पॉलिमरचे उत्पादन भारतातच होणार आहे. यामुळे देशातील कच्च्या मालाचा पुरवठा वाढेल, आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि पॅकेजिंग, ऑटोमोबाईल, शेती तसेच उपभोक्ता वस्तूंसारख्या उद्योगांना मोठी चालना मिळेल.
या बैठकीत बीना शहराला भारताचे पेट्रोकेमिकल हब म्हणून सादर करण्यात आले. त्याचे धोरणात्मक स्थान, एकात्मिक पायाभूत सुविधा आणि मध्य प्रदेश शासनाचे गुंतवणूकदार-स्नेही धोरण यामुळे बीना गुंतवणूकदारांसाठी एक उत्तम केंद्र बनले आहे, असे या कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आले.
याविषयी बोलताना श्री. राघवेन्द्र कुमार सिंह, प्रधान सचिव, औद्योगिक धोरण व गुंतवणूक संवर्धन विभाग, मध्य प्रदेश शासन म्हणाले, “मध्य प्रदेश एक मजबूत गुंतवणूक केंद्र म्हणून उदयास येत आहे. बीपीसीएलची बीना येथील ₹49 हजार कोटींची गुंतवणूक डाउनस्ट्रीम उद्योगांसाठी मोठ्या संधी निर्माण करेल. आम्ही गुंतवणूकदारांसाठी एक सक्षम इकोसिस्टम तयार करत आहोत, ज्यामुळे व्यवसायाला गती मिळेल.”
बीपीसीएलचे संचालक (विपणन) श्री. शुभंकर सेन यांनी सांगितले की, “बीना पेट्रोकेमिकल प्रकल्प हा पॉलिमर क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्याकडे टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे देशांतर्गत कच्च्या मालाची उपलब्धता वाढेल आणि उद्योगांसाठी स्पर्धात्मक संधी निर्माण होतील.”
हा प्रकल्प राष्ट्रीय धोरणात्मक दृष्टीकोन “मेक इन इंडिया” शी थेट जोडलेला आहे, ज्यामुळे स्थानिक उत्पादन आणि रोजगार निर्मितीला मोठा फायदा होईल. बैठकीत उद्योग, शासन आणि गुंतवणूक समुदाय यांच्यातील विविध भागधारकांनी सहभाग घेऊन या क्षेत्राच्या विकासावर चर्चा केली. एमपीआयडीसी आणि बीपीसीएलच्या वरिष्ठ नेतृत्वाने गुंतवणूकदारांना मार्गदर्शन केले आणि बीना हे भारतातील सर्वात आशादायक गुंतवणूक स्थळांपैकी एक असल्याचे स्पष्ट केले.
फॉर्च्यून ग्लोबल ५०० मध्ये स्थान असलेली बीपीसीएल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी तेल आणि ऊर्जा कंपनी आहे. मुंबई, कोची आणि बीना येथे त्यांचे रिफायनिंग युनिट्स असून, एकूण शुद्धीकरण क्षमता 35.3 दशलक्ष मेट्रिक टन प्रति वर्ष (MMTPA) आहे. कंपनीला ‘महारत्न’ दर्जा प्राप्त असून, ती 2040 पर्यंत ‘नेट झिरो एनर्जी कंपनी’ बनण्याचे उद्दिष्ट बाळगून आहे.