
Government Employee Banking Benefits: वित्त मंत्रालयाचा मोठा निर्णय, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी नवे पॅकेज जाहीर
Government Employee Banking Benefits: बुधवारी वित्त मंत्रालयाने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या हितासाठी नवे पॅकेज जाहीर केले आहे. वित्तीय सेवा विभाग (डीएफएस) ने केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी ‘संयुक्त वेतन खाते पॅकेज’ सादर केले आहे. या पॅकेजचा उद्देश एकाच खात्याखाली बँकिंग आणि विमा लाभांसह व्यापक सेवा उपलब्ध करणे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या पॅकेजचे तीन मुख्य घटक आहेत. जसे की बँकिंग, विमा आणि कार्ड, ज्यामुळे हे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एकत्रित वित्तीय समाधान प्रदान करते. ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
हेही वाचा: India-US Trade Deal: 500% ट्रम्प टॅरिफचा धोका टळला? भारताने घटवली रशियन तेल खरेदी
वित्त मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी ‘संयुक्त वेतन खाते पॅकेज’ सुरू करण्याची शिफारस केली असून, त्याचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या आर्थिक भल्यासाठी आणि सामाजिक सुरक्षा वाढविण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
वेतन खाते पॅकेजचे सादरीकरण वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम. नागराजू यांनी केले. या कार्यक्रमात भारतीय स्टेट बँकेचे (SBI) अध्यक्ष, सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ, तसेच डीएफएसचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
सुलभ बँकिंगसह सर्वसमावेशक फायदे
या पॅकेजच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये १.५० कोटी रुपयांपर्यंत वैयक्तिक अपघात विमा, २ कोटी रुपयापर्यंत हवाई अपघात विमा, उत्तम सुविधांसह शून्य शिल्लक असलेले वेतन खाते, तसेच घर, शिक्षण, वाहन आणि व्यक्तिगत गरजांसाठी कर्जावर सोयीस्कर आणि खिशाला परवडेल अश्या व्याज दरांचा समावेश आहे, कार्ड लाभांमध्ये विमानतळ लाउंज प्रवेश, पुरस्कार कार्यक्रम, कॅशबॅक ऑफर आणि अनलिमिटेड व्यवहार व शून्य देखभाल शुल्कांचा समावेश आहे. मंत्रालयाने म्हटले आहे, संयुक्त वेतन खाते पॅकेजमध्ये विमा, वैद्यकीय कव्हर आणि उत्तम बँकिंग सुविधांची जोड देऊन ही योजना कर्मचाऱ्यांना सोयीस्कर प्रवेश, आर्थिक सुरक्षा आणि मानसिक शांती देते.