
वसई-नालासोपाऱ्यात मुसळधार पाऊस! ( सौजन्य - सोशल मीडिया )
रविवारी पहाटे तीनपासून विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या पावसाने शहरातील नाले व गटारे तुडुंब भरून वाहत आहेत. नालासोपारा पूर्वेकडील रेल्वे स्थानक परिसर, सेंट्रल पार्क, तुळींज रोड, गालानगर, विरार पश्चिमेकडील रस्ते आणि नायगाव परिसरातील अनेक भाग जलमय झाले.
नालासोपारा रेल्वे स्थानक परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने लोकल प्रवाशांना पाण्यातून कसरत करत स्थानक गाठावे लागले. दुसरीकडे विरारहून मुंबईअहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनांची गती मंदावली असून चाकरमानी आणि कोकणात जाणाऱ्या भाविकांची प्रचंड वाहतूक कोंडीत अडकून मोठी गैरसोय झाली.
महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने पाणी साचलेल्या ठिकाणी सक्शन पंप लावून पाण्याचा निचरा करण्याचे काम हाती घेतले आहे. तरीही पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा येत आहे. सलग पडणाऱ्या पावसामुळे ऐन सणाच्या तोंडावर शहरात भीतीचे वातावरण असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक आणि व्यापाऱ्यांची या अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली. अनेक मंडळांनी शनिवारीच वाजतगाजत बाप्पाच्या मूर्ती मंडपात आणल्या होत्या. मात्र, रविवारी पहाटेपासून काही गणेश मंडपांमध्ये पाणी शिरल्याने सजावटीचे साहित्य, विद्युत रोषणाई आणि देखावे सुरक्षित ठेवण्यासाठी कार्यकत्यांची एकच धावपळ उडाली. अनेक ठिकाणी कार्यकर्ते पंपांच्या साहाय्याने मंडपातील पाणी बाहेर काढताना दिसत होते.