
दागिन्यांचा विमा कसा उतरवायचा ( सौजन्य - सोशल मीडिया )
आकडेवारीनुसार, भारतातील बहुतेक लोक सोन्याचे दागिने घरात ठेवतात. बरेच जण ते बँकेच्या लॉकरमध्येही ठेवतात. सोने घरी असो वा बँकेच्या लॉकरमध्ये, जर ते हरवले किंवा एखाद्या घटनेमुळे खराब झाले, तर दागिन्यांचा विमा काढणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. पण अशा विशेष परिस्थितीमध्ये घरातील सोन्याच्या दागिन्यांसाठी पर्यय उपलब्ध आहेत का?
घरी सोन्याचे किंवा इतर दागिने ठेवणे ही एक सामान्य गोष्ट आहे. पण त्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. अनेकदा हे दागिने चोरी होण्याची किंवा ते हरवण्याची भीती असते. त्यामुळे, प्रश्न असा आहे की, घरातील सोन्याच्या दागिन्यांचा विमा उतरवता येतो का? तर हो घरातील सोन्याच्या दागिन्यांचा विमा उतरवता येतो. एका अहवालानुसार, सर्वसाधारण विमा कंपन्यांद्वारे जारी केलेल्या ‘householder policy अंतर्गत सोन्याच्या दागिन्यांचा विमा उतरवता येतो. विम्याचा हप्ता प्रत्येक विमा कंपनीनुसार बदलतो आणि तो पॉलिसीमध्ये दिलेल्या संरक्षणाच्या व्याप्तीवर अवलंबून असतो. क्लेम केल्यावर हप्ता बदलू शकतो.
जेव्हा तुम्ही तुमच्या सोन्याच्या दागिन्यांचा विमा काढता, तेव्हा तुम्हाला कळवले जाते की त्यात कोणत्या अटींचा समावेश असेल आणि कोणत्या अटींचा नसेल. विम्याच्या संरक्षणाच्या अटी प्रत्येक विमा कंपनीनुसार वेगवेगळ्या असतात. विमा संरक्षणामध्ये सामान्यतः जबरदस्तीने प्रवेश करणे, घरफोडी आणि चोरी यांसारख्या प्रकरणांचा समावेश असतो. काही विमा कंपन्या घराबाहेर किंवा प्रवासात असताना दागिन्यांचे झालेले नुकसान किंवा चोरी झाल्यास त्याचेही संरक्षण देतात.
यासाठी, दागिन्यांची कागदपत्रे आणि छायाचित्रे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पण जर दागिन्यांवर सामान्य झीज दिसत असेल, साफसफाई किंवा दुरुस्ती दरम्यान ते खराब झाले असतील, हळूहळू खराब होत असतील, किंवा चोरीचा कोणताही पुरावा न ठेवता गायब झाले असतील, तर विमा संरक्षण मिळणार नाही.