
Theft News: पहाटे महिला काकड आरतीला गेली अन् ...सीसीटीव्हीतील दृश्याने पोलिसांची चक्रं फिरवली!
लोणावळ्यातील गवळीवाडा परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील एक महिला पहाटेच्या वेळी नेहमीप्रमाणे काकड आरतीसाठी घराबाहेर पडली होती. महिला घराबाहेर जाताच, पाळत असलेल्या चोरट्याने संधी साधून घरात प्रवेश केला. घरात कोणीही नसल्याचे पाहून चोरट्याने घरातील कपाटाचा ताबा घेतला.
या चोरीत चोरट्याने सोन्याचे मंगळसूत्र, आकर्षक राणीहार, सोन्याच्या चेन, अंगठ्या, कानातील विविध दागिने तसेच २५ हजार ५०० रुपयांची रोकड असा एकूण तब्बल १४ लाख ५ हजार रुपयांचा बहुमूल्य ऐवज चोरून नेला. पूजा आटोपून महिला घरी परतली, तेव्हा घरातील विस्कटलेला सामान आणि चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक संशयित व्यक्ती कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. या फुटेजमध्ये निळ्या रंगाचा शर्ट घातलेला एक व्यक्ती अत्यंत आरामात आणि बेफिकीरपणे घरातून बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर तो रस्त्याच्या कडेला असलेल्या दुसऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही ट्रॅक झाला आहे.
या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आता या चोराचा कसून माग काढत असून, लवकरात लवकर आरोपीला जेरबंद करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. ऐन सणाच्या दिवसांत घडलेल्या या धाडसी चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Ans: लोणावळ्यातील गवळीवाडा परिसरात ही चोरीची घटना घडली.
Ans: चोरट्याने १४ लाख ५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २५ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेली आहे.
Ans: लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित चोरट्याचा शोध घेतला जात आहे.