एप्रिल-जून 2024 मध्ये भारतीय अर्थव्यवस्था मंदावली; नोंदवला 5 तिमाहींमधील सर्वात कमी जीडीपी!
भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) आर्थिक वर्ष 2024-25 साठी जीडीपी वाढीचा अंदाज 7.2 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आरबीआयने एमपीसीच्या बैठकीनंतर सांगितले होते की एप्रिल-जून 2024 च्या तिमाहीत जीडीपी वाढ 7.1 टक्के असेल. मात्र, आता भारताच्या जीडीपी विकास दरात काहीशी घट आली आहे. गेल्या जूनच्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर गेल्या 5 तिमाहीतींल सर्वात कमी नोंदवला गेला आहे. एप्रिल-जून 2024 या तिमाहीत भारताचा जीडीपी वाढीचा दर 6.7 टक्के नोंदवला गेला आहे. जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत जीडीपी वाढ 8.2 टक्के नोंदवला गेला होता.
जीडीपी वाढीचा दर 6.7 टक्क्यांपर्यंत
सरकारी आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर 6.7 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सरकारी खर्च कमी झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास मंदावेल, अशी अपेक्षा अर्थतज्ज्ञांना होती. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारत आपले स्थान कायम टिकवून आहे.
कोणत्या क्षेत्रात घसरण, कोणत्या क्षेत्रात वाढ?
भारतातील सर्वात महत्त्वाचे क्षेत्र मानल्या जाणाऱ्या कृषी आणि खाण क्षेत्रात मोठी घसरण दिसून आली आहे. एप्रिल-जून 2025 दरम्यान कृषी क्षेत्रातील वाढ 2 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. तर आर्थिक वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत ती 3.7 टक्के होती. त्याच वेळी वीज क्षेत्राची वाढ जूनच्या तिमाहीत 10.4 टक्के झाली आहे. जी गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 3.2 टक्के होती. यानंतर खाणकाम, उत्पादन, सार्वजनिक प्रशासन आणि सेवा आणि बांधकाम क्षेत्रात चांगली वाढ झाली आहे.
काय सांगतो एसबीआय व मुडीजचा अंदाज
भारतीय स्टेट बँक (एसबीआय) रिसर्चने आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा अंदाज 7.1 टक्के वर्तवला होता. एसबीआयच्या रिसर्चनुसार, एप्रिल-जून 2024 या तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था वाढीचा अंदाज 7.0 ते 7.1 टक्क्यांच्या दरम्यान होता. जो प्रत्यक्षात 6.7 टक्क्यांवर आला आहे. एप्रिल-जून 2024 तिमाहीच्या जीडीपी डेटाच्या आधी, मुडीजने भारतासाच्या जीडीपी वाढीचा सुधारित अंदाज व्यक्त केला होता. मूडीजच्या रेटिंगनुसार, भारताचा जीडीपी कॅलेंडर वर्ष 2024 मध्ये 7.2 टक्के आणि कॅलेंडर वर्ष 2025 मध्ये 6.6 टक्के दराने वाढण्याची अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.