
New Zealand Visa: न्यूझीलंडचा मोठा निर्णय, भारतीय व्यावसायिकांना मिळणार ४ वर्षांचा वर्क व्हिसा
New Zealand Visa: न्यूझीलंडने त्यांच्या मुक्त व्यापार कराराअंतर्गत प्रवासाच्या तरतुदी शिथिल केल्या आहेत. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासानंतर दीर्घकालीन वर्क व्हिसा मिळू शकेल आणि योग प्रशिक्षक आणि हटिल शेफसह ५,००० भारतीय व्यावसायिकांना तेथे काम करता येईल. दोन्ही देशांनी सोमवारी मुक्त व्यापार करार (एफटीए) वाटाघाटी संपल्याची घोषणा केली. त्यावर स्वाक्षरी होण्याची आणि सुमारे सात ते आठ महिन्यांत अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात या कराराला मान्यता दिली. हा करार न्यूझीलंडच्या संसदेकडून मंजुरी मिळण्याचीही वाट पाहत आहे.
या करारांतर्गत, न्यूझीलंडने प्रथमच कोणत्याही देशासोबत विद्यार्थी गतिशीलता आणि अभ्यासोत्तर कामाचा व्हिसा करार केला आहे. संख्यात्मक मर्यादा नाही आणि भारतीय विद्यार्थ्यांना आठवड्यातून २० तास काम करण्याचा अधिकार आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की, गतिशीलतेच्या बाबतीत, न्यूझीलंडमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पदवी अभ्यासक्रम केल्यास दोन वर्षांचा वर्किंग व्हिसासाठी पात्रता असेल, जर त्यांनी ऑनर्ससह बॅचलर पदवी किंवा स्टेम अर्थात विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली असेल तर तीन वर्षांचा वर्किंग व्हिसासाठी असेल पात्रता आणि यूझीलंडमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले असेल तर चार वर्षांचा वर्किंग व्हिसासाठी पात्रता असेल.
त्यांनी असेही सांगितले की, योग प्रशिक्षक, शेफ, व्यावसायिक, आयटी व्यावसायिक, शिक्षक, परिचारिका यांसारख्या अंदाजे ५,००० भारतीय व्यावसायिकांना न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेत योगदान देण्यासाठी व्यावसायिक व्हिसा मिळेल. अंदाजे १२,००० भारतीय विद्यार्थी सध्या न्यूझीलंडमध्ये विविध अभ्यासक्रमांमध्ये नोंदणीकृत आहेत. हा करार नवीन तात्पुरत्या रोजगार प्रवेश व्हिसाद्वारे कुशल नोकऱ्यांमध्ये काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना कुशल रोजगाराचे मार्ग प्रदान करतो. त्यात कोणत्याही वेळी ५,००० व्हिसाचा कोटा आणि जास्तीत जास्त तीन वर्षांचा वास्तव्य समाविष्ट आहे. वाणिज्य मंत्रालयाने सांगितले की हे विद्यमान व्हिसा मार्गाव्यतिरिक्त आहे.
व्यावसायिक आणि कुशल कामगार विद्यमान व्हिसा व्यवस्थांअंतर्गत (जसे की मान्यताप्राप्त नियोक्ता कार्य व्हिसा, कुशल स्थलांतरित श्रेणी निवास व्हिसा, इ.) न्यूझीलंडमध्ये अर्ज करणे सुरू ठेवू शकतात. मंत्रालयाने म्हटले आहे की, हे भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या सध्याच्या व्हिसा श्रेणींची जागा घेत नाही किंवा त्यांना कमकुवत करत नाही. त्याऐवजी, ते तात्पुरत्या रोजगारासाठी प्राधान्य, एफटीए-लिंक्ड चचॅनेल प्रदान करून एकूण हालचाली चौकटीचा विस्तार करते. याव्यतिरिक्त, वर्किंग हॉलिडे व्हिसाच्या अंतर्गत. न्यूझीलंड दरवर्षी १,००० तरुण भारतीयांना १२ महिन्यांच्या कालावधीसाठी बहु-प्रवेश व्हिसा देईल. करारामध्ये आरोग्य आणि पारंपारिक औषध सेवांवरील करार देखील समाविष्ट आहे, जी आरोग्याशी संबंधित सेवा आणि पारंपारिक औषध सेवांमध्ये व्यापार सुलभ करेल.