सरकारविरोधात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक; मंत्री विखेंच्या गावात करणार अन्नत्याग आंदोलन!
राज्यातील दूध उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आधीच दुधाला मिळणारा कमी दर, त्यात सरकारचे दूध पावडर आयात करण्याचे सरकारचे धोरण यामुळे संकटात सापडलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. उद्यापासून अर्थात १ जुलैपासून दुध उत्पादक शेतकरी राज्यभर पदयात्रा काढणार आहे. पदयात्रा संपल्यानंतर अन्नत्याग आंदोलन केले जाणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य शेतकरी दूध उत्पादक संघटनेचे उपाध्यक्ष अजित काळे यांनी दिली आहे.
दूध दरासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार
दरम्यान, राज्यातील अन्य एका दूध उत्पादक संघटनेने याआधीच 25 जूनपासून राज्यभर रास्ता रोको अभियान सुरु केले आहे. अशातच आता महाराष्ट्र राज्य शेतकरी दूध उत्पादक संघटने देखील दूध दराच्या आंदोलनात उडी घेतली आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य दर मिळावा, अशी या संघटनांची मागणी आहे. संघटनेच्या काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दूध दराचा प्रश्न आता थेट सर्वोच्च न्यायालयात उपस्थित केला जाणार आहे. त्या ठिकाणी डेअरी उत्पादक कंपन्यांविरोधात लढाई लढली जाणार आहे.
कसा असेल पदयात्रेचा मार्ग?
दूध उत्पादक शेतकरी संघटनेच्या माहितीनुसार, १ जुलै रोजी दुध उत्पादक शेतकऱ्यांची पदयात्रा सातारा जिल्ह्यातून सुरु होणार असून, ती दुसऱ्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. अहमदनगर जिल्ह्यात राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गावात पदयात्रेचा थांबा असणार आहे. पुढील तीन ते चार दिवसांत सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास अन्नत्याग आंदोलन केले जाईल. विशेष म्हणजे सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही. तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य शेतकरी दूध उत्पादक संघटनेचे उपाध्यक्ष अजित काळे यांनी सांगितले आहे की, “गेल्या 25 जूनपासून राज्यभरात रास्ता रोको आंदोलन केले जात आहे. हे आंदोलन 15 जुलैपर्यंत सुरूच राहणार आहे. विशेष म्हणजे आता दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हे आंदोलन अधिक व्यापक केले जाणार असून, सरकारला दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत या माध्यमातून अवगत केले जाणार आहे.”